NCP

  NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अजित पवारांसह ९ नेत्यांनी भाजप-शिवसेना यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले. अजित पवार गटाने पक्ष नाव आणि चिन्हावर दावा सांगितला. तर पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी अजित पवारांना समर्थन दिलं. काही नेते आधी अजित पवारांसोबत गेले, आणि नंतर शरद पवारांकडे परत आले, त्यातीलच एक नेते हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचे पहायला मिळाले.

  आमदार अशोक बापू पवार दिलीप वळसे पाटलांच्या गाडीत

  हवेलीचे शरद पवार गटाचे आमदार अशोक बापू पवार हे आज अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गाडीत दिसले. त्यामुळे ते अजित पवार गटात जाणार का याबाबतची चर्चा रंगली आहे. दरम्यान, सुरुवातीला अशोक पवारांनी अजित पवारांना समर्थन दिले होते. नंतर ते शरद पवार गटात गेले. मात्र, ते आज दिलीप वळसेंच्या गाडीत दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  पुन्हा अजित पवार गटात जाणार का

  आज सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अशोक बापू पवार दिलीप वळसे पाटलांच्या गाडीत दिसून आले. त्यामुळे अजित पवार गटातून परत आलेले अशोक बापू पवार हे पुन्हा अजित पवार गटात जाणार का, अशा चर्चादेखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

  वळसे पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट

  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे दाखल झाले. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात आहेत. सध्या ते सरकारमध्ये सहकारमंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून दिलीप वळसे पाटील यांची राजकारणात ओळख आहे. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ते शरद पवारांना भेटले.

  भेटीनंतर वळसे पाटलांनी सांगितलं कशावर झाली चर्चा?

  वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, ही पूर्वनियोजित भेट होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  ही भेट पूर्वनियोजित

  पुढे बोलताना ते म्हणाले की, ही भेट पूर्वनियोजित होती. रयत शिक्षण संस्थेचे अनेक पदाधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने भेट झाली आहे, या भेटीमागे वेगळे कारण नाही.

  शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतो

  या भेटीमुळे संभ्रम निर्माण होण्याचे काहीचं कारण नाही. मी अनेक संस्थांमध्ये काम करीत आहे, त्या संस्थांच्या कामासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतो. सहकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून काही निर्णय घेण्यात आले आहेत ते शरद पवार यांच्या कानावर घातले आहेत, असेही दिलीप वळसे पाटलांनी म्हटले आहे