भारत जोडो यात्रेत आज राष्ट्रवादीचे नेतेही होणार सहभागी

आज सकाळी सहा वाजता नायगाव तालुक्यातील कापशी गुंफा या ठिकाणाहून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. पावसाळा, हिवाळा या दोन ऋतुंच्या जोडावर आणि बोचऱ्या थंडीत हजारोंच्या जनसमुदायासह भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून संवाद साधत आहेत.

    मुंबई – नांदेडमधून (Nanded) सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज चौथा दिवस आहे. या यात्रेत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकीय नेत्यांसह खेळाडूही दाखल झाले आहेत. नागपूर येथील काँग्रेसच्या नेत्या नॅश नुसरत अली (Nash Nusrat Ali) या देखील भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत ही यात्रा पादाक्रांत करत आहेत. भारतीय रणजी क्रिकेट संघाच्या महिला खेळाडू असणाऱ्या नॅश नुसरत अली या महाराष्ट्रभर यात्रा करणार आहेत.

    आज सकाळी सहा वाजता नायगाव तालुक्यातील कापशी गुंफा या ठिकाणाहून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. पावसाळा, हिवाळा या दोन ऋतुंच्या जोडावर आणि बोचऱ्या थंडीत हजारोंच्या जनसमुदायासह भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करत आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) विविध घटकातील लोकांना भेटून संवाद साधत आहेत. यात्रा नांदेड शहरात १० वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. त्यानंतर देगलूर नाका, बाफना टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा या प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करत संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेत आजचा टप्पा संपणार आहे.

    काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा आज ६४ वा आणि महाराष्ट्रातील चौथा दिवस आहे. आज या यात्रेत राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.