
दिल्लीच्या 'अदृश्य शक्ती'ने महाराष्ट्राचा खेळखंडोबा केला आहे. त्यांना सर्व पक्ष फोडायचे आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला त्रास दिला. केवळ मराठी असल्यानेच हे सुरू आहे. मराठी माणसाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.
सोलापूर : दिल्लीच्या ‘अदृश्य शक्ती’ने महाराष्ट्राचा खेळखंडोबा केला आहे. त्यांना सर्व पक्ष फोडायचे आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाला त्रास दिला. केवळ मराठी असल्यानेच हे सुरू आहे. मराठी माणसाचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. हे सर्व दिल्लीतील ‘अदृश्य शक्ती’चे कारस्थान असून, या शक्तीच्या विरोधात आम्ही एकजुटीने लढणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवाज हॉल येथे आयोजित अल्पसंख्याक मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सोलापूर शहराशी आमचा फार जिव्हाळा आहे. या शहराने शरद पवारांना प्रेम दिले. त्याबद्दल मी आभार मानते. आज या शहराची अवस्था फार बिकट झाली आहे. शहराला पाच दिवसाआड पाणी मिळते. हे सरकार निवडणुका जवळ आल्यावर आणखी किती जुमले देतील ते सांगता येत नाही. शहरातील रस्ते बरोबर नाहीत. शहरात सर्वत्र खड्डे असताना या शहराला स्मार्ट सिटीचे बक्षीस कसे मिळाले तेच कळत नाही.
कॉपी करून पास झाल्यानेच हे बक्षीस मिळाले असावे, आज शहराला सिटीबस, एसटी नाही. येथील खासदार कोण आहेत तेच माहिती नाही. शहराचा विकास झाला पाहिजे. पुणे येथे मेट्रो सुरू केली, त्याचे आम्ही स्वागत केले. चांगल्या कामाला आमचा विरोध कधीही नसतो. येथील साखर कारखान्याची चिमणी पाडली गेली. विमानसेवा सुरू झाली का? असा प्रश्नही त्यांनी केला.