‘फडणवीसांचे दिल्लीश्वरांकडून पंख कापण्यात आले’;सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान

'देवेंद्र फडणवीस हे आता पूर्वीसारखे कार्यरत नाहीत दिल्लीश्वरांकडून त्यांचे पंख कापण्यात आले आहेत' अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉईंट’या मुलाखतीपर कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या.

    राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यावर जहरी टीका केली. शिवसेनेमध्ये (Shiv Sena) बंड झाल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळल्या गेले. सुरुवातीला सत्तेमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगत नंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली. यामुळे विरोधकांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. आता या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना घेरले आणि ‘देवेंद्र फडणवीस हे आता पूर्वीसारखे कार्यरत नाहीत दिल्लीश्वरांकडून त्यांचे पंख कापण्यात आले आहेत’ अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या ‘टू द पॉईंट’या मुलाखतीपर (To the point interview) कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या.

    अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख दिल्लीश्वरांकडून कापण्यात आलेत का? असा सवाल केला यावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अर्थातच दिल्लीश्वरांकडून त्यांचे पंख कापण्यात आले आहेत. भाजपाचं नेतृत्व मी अगदी जवळून पाहिलं आहे. अटलजींचा एक कोअर ग्रुप होता, तेव्हा भाजपात लोकशाही होती. आता ते नेते कुठे आहेत? महाराष्ट्रात पाच वर्षे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे देवेंद्र फडणवीस तेच आहेत का? तर नाही. विरोधकही दिलदार असला पाहिजे. विनोद तावडे कुठे दिसतात? पंकजा मुंडे कुठे आहेत? एकनाथ खडसेंचं काय केलं ते सगळ्यांनाच माहीत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशचं उदाहरणच मी तुम्हाला देते. शिवराज सिंग चौहान यांनीच मध्य प्रदेश जिंकून आणला. त्यांना मामा म्हटलं जातं. मात्र मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवण्यात आलं नाही. त्यांच्यावर काहीही आरोपही नाहीत. तरीही त्यांना डावललं गेलं. तसंच इथेही घडलं.” अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

    “देवेंद्र फडणवीस आता पूर्वीप्रमाणे बोलत नाहीत. एका प्रश्नाचं उत्तर देतात आणि निघून जातात. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे 105 आमदार जास्त दिसत नाहीत. उलट दादा (अजित पवार) आणि एकनाथ शिंदे यांचेच लोक जास्त दिसतात. मी पाच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं आहे. त्यांची पूर्ण कमांड सरकारवर होती. ते खूप चांगले प्रशासक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांची यंत्रणा परिणामकारकरित्या चालवली. मला त्यांचं सरकार चालवणं पटलं नाही. पण त्यांनी त्यांची यंत्रणा चांगली चालवली. त्यांनी स्वतःचा आदर्शवाद,विचार कधीच सोडला नाही.” असे सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले. त्याचबरोबर ते आता जास्त दिसत नाहीत अशी टीका देखील केली.