राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आजपासून विदर्भ दौऱ्यावर; पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच येताहेत नागपुरात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रविवारपासून तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूर, वर्धा व अमरावती येथील पदाधिकाऱ्यांसोबत त्या बैठका घेतील.

    नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रविवारपासून तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूर, वर्धा व अमरावती येथील पदाधिकाऱ्यांसोबत त्या बैठका घेतील. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्या प्रथमच नागपुरात येत आहेत. यापूर्वी, आमदार रोहित पवार यांनीही नागपुरात येत पक्ष बांधणीचा आढावा घेतला होता. सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यादेखील असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी दिली.

    नागपुरात रविवारी आगमनानंतर दुपारी 12.30 वाजता दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर दुपारी 2 पासून सिव्हील लाईन्स येथील स्वागत लॉन येथे पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पक्ष संघटनेचा आढावा घेतील. सायंकाळी पत्रपरिषद करतील. सोमवार, 2 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता पवनार आश्रमला भेट देतील. सकाळी 10 वाजता सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देत अभिवादन करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करतील. दुपारी 12 वाजता वर्धा विश्रामगृहात काही सामाजिक संघटनासोबत चर्चा करतील. दुपारी 2 वाजता सिव्हील लाईन्स येथील महात्मा सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेतील. ज्येष्ठ गांधीवादी नेते स्व. वसंत कार्लेकर यांच्या घरी भेट दिल्यानंतर त्या अमरावीला जातील.

    त्यानंतर मंगळवारी, 3 ऑक्टोबरला सकाळी 8.30 वाजता अंबादेवी व एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी 11 वाजता कॅम्प रोडवरील नवीन शहर राष्ट्रवादी पक्ष कार्यालय उद्घाटन, दुपारीच पत्रपरिषद घेतील. त्यानंतर राजापेठ येथे राष्ट्रवादी युवक कार्यालयाचे उद्घाटन करतील. दुपारी 2 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोशीं रोड येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत आढावा घेतील. त्यानंतर नागपूरमार्गे पुण्याकडे रवाना होतील.