विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय अखेर अजितदादा गटाकडे; विधानसभा अध्यक्षांचा महत्त्वपूर्ण निर्णय

हिवाळी अधिवेशनात (Winter Session) उपस्थित होणारे प्रश्न आणि मुद्यांकडे राज्याचे लक्ष असणार आहे. पण, त्याआधी सर्वाधिक उत्कंठा होती, ती विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय (NCP Office) कुणाकडे जाणार याबाबत.

    नागपूर : हिवाळी अधिवेशनात (Winter Session) उपस्थित होणारे प्रश्न आणि मुद्यांकडे राज्याचे लक्ष असणार आहे. पण, त्याआधी सर्वाधिक उत्कंठा होती, ती विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय (NCP Office) कुणाकडे जाणार याबाबत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या कार्यालयाचा ताबा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे देण्यात आला आहे.

    कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटीही लावण्यात आली आहे. दरम्यान, यावरून वादंगाची शक्यता निर्माण झाली असतानाच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अतिशय सावध पवित्रा घेतला आहे. मागील अधिवेशनात शिवसेनेच्या कार्यालयासंदर्भात असाच वाद निर्माण झाला होता. हे कार्यालय शिंदे गटाकडे देण्यात आले होते.

    आमचा पक्षच ओरिजनल

    आमचा पक्षच ‘ओरिजनल’ आहे. यामुळे पक्ष कार्यालयाबाबत कुठलीही मागणी आम्ही केली नाही. कुणी अर्ज केला असेल तर त्याची दखल घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे. पण, अपात्रतेसंबंधी निर्णयापूर्वीच अध्यक्षांनी केलेली ही कृती ‘प्रिज्युडाईस अॅक्शन’ (पूर्वग्रहदूषित) ठरेल.

    – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट.