‘पवार विरुद्ध पवार करण्याचा भाजपचा प्रयत्न’; रोहित पवार यांचा घणाघात

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली असून रोहित पवार यांनी देखील निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत बसणार नाही. असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

    बारामती : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी राष्ट्रवादी पक्षातील आमदार अपात्रतेचा (NCP MLA Disqualification) निर्णय दिला. राष्ट्रवादी खरी अजित पवार यांची असून खरा पक्ष म्हणून अजित पवार (Ajit Pawar) गटाला मान्यता दिली. यानंतर महाविकास आघाडीतील (MVA)घटक पक्षांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली असून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार (Sharad Pawar) आता शांत बसणार नाही. असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

    रोहित पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या राजकारणावर ताशेरे ओढले आहेत. भाजपने पक्ष आणि कुटुंब फोडले. आजपर्यंत भाजपला जे जमलं नाही ते, कुटुंब फोडून करत आहेत. पवार विरुद्ध पवार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर कळेल. त्यानंतर बारामतीकर काय करायचं ते ठरवतील असा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर पवार कुटुंब फोडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    पुढे रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले, विधान सभा अध्यक्षांनी अन्याय करणारा निकाल दिला आहे. त्यांचा निकाल म्हणजे बाटली तीच फक्त औषध नवीन आहे. निकालाची स्क्रीप्ट दिल्लीतून आलेली आहे. आम्ही खरं बोलतोय. मग हे नाटक कशाला करायचे. 2024 साली भाजप आल्यावर संविधान राहणार नाही. अशी जहरी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.