घराणेशाहीच्या राजकारणाबाबत राष्ट्रवादीला १०० पैकी १०० गुण; निर्मला सीताराम‌ण यांचा आरोप

घराणेशाहीतून भाऊबंदकीच्या राजकारणाचा जन्म होतो, व त्यातून भ्रष्टाचार जन्माला येतो, या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसला १०० पैकी १०० गुण मिळतील, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम‌ण यांनी केली.

    बारामती : घराणेशाहीतून भाऊबंदकीच्या राजकारणाचा जन्म होतो, व त्यातून भ्रष्टाचार जन्माला येतो, या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसला १०० पैकी १०० गुण मिळतील, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम‌ण यांनी केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री सीतारामण यांचे पुरंदर तालुक्यातून बारामती विधानसभा मतदारसंघात आगमन झाले. मोरगाव येथील मयुरेश्वर मंदीरात दर्शन घेतल्यानंतर त्यांचे बारामती शहरात आगमन झाले. बारामती शहरातील भाजप कार्यालयास त्यांनी भेट देऊन पक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

    यावेळी माजी मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर,भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,कांचन कुल, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलिप खैरे, जालींदर कामठे, रामचंद्र निंबाळकर, मारुतराव वणवे, तानाजीराव थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    यावेळी सीतारामण म्हणाल्या, आपण बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा याठिकाणी भाजपचे संघटन मजबुत करण्यासाठी सुरु केला असून, २०२४ लोकसभा निवडणुकी पुर्वी व नंतरही मी वारंवार येणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, मी याठिकाणी येणार असल्याने वातावरण तापले आहे. देशातील १४४ लोकसभा मतदार संघ निवडण्यात आले असून या मतदार संघात पक्षीय संघटन मजबुत करण्यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती दौऱ्यावर मी आले असताना अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना शासकीय सुविधां‌पासून‌‌ वंचित ठेवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात असल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आपला हा दौरा बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आहे.

    भाजपने नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला आहे, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घराणेशाहीला विरोध केला पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणामुळेच आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या विरोधात जनता मतदान करत आहे. या घराणेशाहीमुळेच अमेठी मध्ये परिवर्तन झाले, सध्या त्या ठिकाणी गेली पन्नास वर्षात कधी झाला नाही एवढा विकास सध्या सुरू आहे. बारामती मतदारसंघांमध्ये झालेला विकास समान दृष्टीने झालेला नाही, केंद्र सरकारच्या योजना ज्या ठिकाणी पोचल्या नाहीत, त्या का पोहोचल्या नाहीत, माहिती पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अति मागास असलेल्या ११५ जिल्ह्यांची निवड करून त्या जिल्ह्यांना मागास न म्हणता प्रेरणादायी असे नाव देऊन त्या जिल्ह्यांचा कायापालट सुरू केला आहे.

    ते स्वतः संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्येक महिन्याला चर्चा करतात. राजकारण न करता समान दृष्टीने ते या जिल्ह्यांना विकासाच्या मार्गावर आणत आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून विकासाच्या बाबतीत राजकारण सुरू आहे, दुर्दैवी आहे. स्वतःला राष्ट्रवादी म्हणणाऱ्या पक्षाकडून हे अपेक्षित नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. घराणेशाहीचे राजकारण जनतेचा कधीच विकास करत नाही, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता घराणेशाहीच्या विरोधात आहे. घराणेशाहीचे राजकारण सुरू असलेल्या बारामती मतदारसंघांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी खूप वाव आहे. गरीबी हटाव चा नारा देणाऱ्या काँग्रेसने गरिबी नष्ट करण्या ऐवजी गरिबांना संपवले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. आपण २०२४ पुर्वी व त्यानंतरही बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये वारंवार येणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. यावेळी स्वागत भाजपचे शहराध्यक्ष सतीश फाळके यांनी केले. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी केले.