जनता दरबारमध्ये सुप्रिया सुळेंचा एल्गार; म्हणाल्या, “सरकारने इतर वाऱ्या बंद करून…”

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात हा जनता दरबार सुरू असून या दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

  बारामती : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांचा जोरदार प्रचार चालू आहे. बारामती मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढाई होणार असून सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा आज जनता दरबार पार पडत आहे. बारामती येथील भिगवन चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात हा जनता दरबार सुरू असून या दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर देखील आक्षेप नोंदवला आहे.

  शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधून भाजपवर निशाणा साधला. खासदार सुळे म्हणाल्या, “बारामतीसह राज्याच्या अनेक भागात पाणी दुष्काळ असे गंभीर प्रश्न आहेत. माझ्यासाठी दुष्काळी परिस्थिती ही सगळ्यात मोठ आव्हान आहे. सरकारने इतर वाऱ्या बंद करून अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणवीस जर माझ्या मतदार संघात आले तर त्यांचे स्वागत होईल. राज्यातील जनतेला त्यांनी चांगल काहीतरी द्यावे  ही अपेक्षा” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

  कांदा निर्यात बंदीचा जाहीर निषेध

  केंद्र सरकारने पुन्हा एकदा कांदा निर्यात बंदी लावली आहे. या निर्णयाचा देखील सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला. खासदार सुळे म्हणाल्या, “कांदा निर्यात बंदीचा मी जाहीर निषेध करते. कांद्याला हमीभाव मिळावा आणि निर्यात बंदी उठावी यासाठी आम्ही लढत होतो. अमोल कोल्हे आणि मला निलंबित करण्यात आले. मी अनेकदा पियुष गोयल यांना निवेदन दिले आहे. दूध उत्पादक, शेतकरी आणि इतर लोक अडचणी देत आहे हे मी सातत्याने सांगत आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

  केजरीवाल यांना अटक ही गंभीर बाब

  आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. निवडणूकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी झालेल्या या अटकेमुळे विरोधकांना धक्का बसला आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अशा पद्धतीने अटक करणे या गोष्टी तोट्या आणि फायद्याच्या नसतात. दडपशाहीच्या गोष्टी असतात. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे केजरीवाल यांना अटक हे गंभीर प्रकरण आहे. जुगाराच्या कंपनीने जवळपास 1300 कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड घेतले आहेत. स्टेट बँकेबाबत एक प्रकरण बाहेर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती घेत आहे. सगळ्यांशी पक्षांची चौकशी करा यातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल ” अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.