‘आगामी काळात प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये सहभागी होऊ शकतात’; शरद पवार यांचा राजकीय अंदाज, चर्चांना उधाण

आगामी काळामध्ये अनेक पक्ष हे कॉंग्रेसमध्ये विलिन होतील असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे

    पुणे : राज्यासह देश पातळीवरील राजकारणामध्ये मोठा बदल झाला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्षांचे दोन गट झाले आहेत. राजकारणातील जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी राजकीय भविष्याचे भाकित केले आहे. आगामी काळामध्ये अनेक पक्ष हे कॉंग्रेसमध्ये विलिन होतील असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे राजकीय भाकित व्यक्त केले आहे.

    मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, “2024 च्या निकालानंतर काही पक्ष हे कॉंग्रेसमध्ये विलीन होतील. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष देखील कॉंग्रेससोबत जाण्याची शक्यता आहे.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणूकीचा निर्णायक टप्पा पार पडत असताना शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यामध्ये लवकरच पुन्हा एकदा राजकीय भुंकप होताना दिसून येणार आहे.

    आमची विचारधारा कॉंग्रेससोबत जुळणारी 

    यानंतर शरद पवार यांना तुमचा राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन होणार का? असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “मी आत्ताच काही आमच्या पक्षाबद्दल सांगू शकत नाही. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. आमची विचारधारा कॉंग्रेससोबत जुळत आहे. दोन्ही पक्ष नेहरु आणि गांधींच्या विचारधारेवर चालणारे आहेत. नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणं अवघड आहे. मात्र आमच्या पक्षाबाबत कोणताही निर्णय घाईमध्ये देखील घेतला जाणार नाही,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.