डमी कोश्यारींचे धोतर फेडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या भाषणात एकेरी उल्लेख केला. शिवाय त्यांची गडकरी, पवारांशी तुलना केली. यावरून वाद पेटला आहे.

    पुणे – डमी भगतसिंह कोश्यारी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात धोतर फेडले. राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल हटावची मागणी आंदोलकांनी केली.

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या भाषणात एकेरी उल्लेख केला. शिवाय त्यांची गडकरी, पवारांशी तुलना केली. यावरून वाद पेटला आहे. पुण्यात याप्रकरणी राज्यपालांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा  ६२ वा दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, मागच्याच वर्षी या दोघांनाही माझ्या हस्ते मानद पदवी देण्यात आली. आता पुन्हा या दोघांना माझ्या हस्ते डिलीट दिली गेली. आणखी दोन ते तीन विद्यापीठांची डिलीट यांना देणे बाकी आहे. तेथील कुलगुरूंना मी म्हणतो तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का.? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांनाच डिलीट द्यायची आहे. म्हणून माझाही नाईलाज होतो.