सुप्रिया पवार विरुद्ध सुनेत्रा पवार लढत निश्चित; सुनील तटकरेंनी सांगितली ‘अंदर की बात’

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शह देण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे म्हणता येईल.

  मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीतील बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शह देण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे म्हणता येईल. कारण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत वक्तव्य केले आहे. ‘मी अधिकृतपणे सांगतो’ असे देखील सुनील तटकरे म्हणाले.

  अधिकृतपणे सांगतो की सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार

  एका वृत्तवाहिनीच्या केलेल्या बातचीतमध्ये सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल मत व्यक्त केले. यावेळी तटकरे म्हणाले, बारामतीची जागा आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. बारामतीची जागा आम्हाला मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल. त्यावर चर्चा होईल. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत खूप मोठं सामाजिक काम केलेलं आहे. बारामती टेक्स्टाईल, बारामती क्लब, अनेक शैक्षणिक संस्था, विद्या प्रतिष्ठान असेल या साऱ्यांत सुनेत्रा पवार यांनी काम केलेलं आहे. सुनेत्रा पवार यादेखील भाषण करतात. राष्ट्रवादीने ही जागा लढवायची ठरवली तर मी अधिकृतपणे सांगतो की सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील, महायुतीत बारामतीची जागा आमच्याकडे आली तरच सुनेत्रा पवार या बारामतीच्या उमेदवार असतील. मात्र जागावाटपावर अद्याप चर्चा नाही, असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मांडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याची शक्यता अधिक दृढ होत आहे.

  एका महिलेने दुसऱ्या महिलेबाबत असं वक्तव्य करावं हे दुर्दैवी

  सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला. तटकरे म्हणाले, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. आम्ही वैचारिक लढा उभा करत आहोत. एका महिलेने दुसऱ्या महिलेबाबत असे वक्तव्य करावं हे दुर्दैवी आहे. कुठल्याही महिला खासदाराचा पती भोजनालयात बायकोची पर्स घेऊन बसलेला मी पाच वर्षांत पाहिलेला नाही. पण सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान हे थेट सुनेत्रा पवार यांच्यासाठी होतं, असं मी मानतो. मला नम्रपणे सांगायचं आहे की अजित पवार गेली 35 वर्षांपासून भाषण करत आहेत. सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठीदेखील तीन वेळा अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. मग हे सारं का विसरावं? नैराश्य येऊ शकतं. पण हे नैराश्य एवढ्या पराकोटीच्या वक्तव्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं, अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

  काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?

  एका भाषणामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला होता. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळे यांना पाठवते. ते भाषण करतील. पण, सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये तिथे जाऊन विषय मांडायचे. मलाच लढायचं आहे. माझा नवरा येऊन भाषण करेल ते तुम्हाला चालेल का? तुम्ही मला मतं द्याल का? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार की मी जाणार आहे. नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. कॅन्टीनमध्ये बसावं लागतं. अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.