यवत येथे दूधदरवाढीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन ; आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतले

शासनाने दुधासाठी निश्चित केलेला हमी दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांवर कारवाई करावी, दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा. या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर दूध ओतून देत आंदोलन केले.

    यवत : शासनाने दुधासाठी निश्चित केलेला हमी दर न देणाऱ्या सरकारी व खाजगी दूध प्रकल्पांवर कारवाई करावी, दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा. या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या सेवा रस्त्यावर दूध ओतून देत आंदोलन केले.

    या आंदोलनात तरूण व सुशिक्षित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागील काही कालावधीपासून दुधाचा दर सातत्याने घसरत चालला आहे. सध्या तो ३५ रुपयांवरुन अचानक कमी होवून २६ ते २९ रुपयांवर आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठ्या अर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतपीक येईल की नाही याची खात्री नाही. या आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला.

    सरकारने दूध दरवाढ लवकरात लवकर करावी. दूध दरवाढ ४० रुपये प्रति लिटर हमीभाव जाहीर करावा, जून ते आजपर्यंत दुधाला मिळालेला कमी दरातील फरक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा, पशुखाद्याच्या किंमती २५ टक्क्यांनी कमी कराव्यात, सध्या महागाई खुप वाढत आहे; परंतु वाढत्या महागाईच्या प्रमाण दुधाचे भाव एक रूपयाने सुद्धा वाढत नसून ते कमी-कमी होत आहे. तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा खर्च हा देखील वाढत आहे. या महागाईला आळा घालण्यासाठी दुधाला वाढता बाजार भाव मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सर्व दुध व्यवसायीक यांच्यावतीने दौंड तहसील कार्यालयाचे अधिकारी तथा यवतचे मंडल अधिकारी प्रकाश गोंडे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नियोजन दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे व सहकारी यांनी केले.

    यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे,दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काळभोर,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष भाऊसाहेब फडके, सरिका भुजबळ,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आनंद शेलार, किसान सेलचे अध्यक्ष राहुल वर्पे, रोहन दोरगे,सागर खुटवड,दिपक दोरगे,मयूर दोरगे, सोनू ताकवले, मनोज शेळके,उमेश म्हेत्रे, विलास नागवडे,माणिकराव दोरगे यांसह यवत आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.