कोरेगावच्या विकास प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या राष्ट्रवादीचे रमेश उबाळेंवर कारवाईची मागणी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची मागणी

  कोरेगाव : कोरेगाव शहरात कधी नव्हे एवढ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत असलेली विकास कामे सुरू आहेत. सर्वसामान्य जनता हीच विकास कामांबद्दलची क्वालिटी कंट्रोलरची भूमिका बजावत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे हे विशिष्ट हेतूने आणि व्यक्ती देशातून कोरेगाव नगरपंचायतीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरेगाव शहराची नाहक बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे व उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्यासह १३ नगरसेवक व नगरसेविकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
  गुरुवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, पंचायत समितीचे माजी सदस्य तथा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र बोतालजी, नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, माजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक जयवंत पवार, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, सागर वीरकर, राजेंद्र वैराट, परशुराम बर्गे, वनमाला बर्गे, संगीता ओसवाल, शितल बर्गे, संजीवनी बर्गे, स्नेहल आवटे, स्वीकृत नगरसेवक फिरोज काझी, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, शिवसेना शिंदे गट कोरेगाव शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, अनिकेत सूर्यवंशी व संजय दुबळे यांनी भेट घेतली व कोरेगाव नगरपंचायतीच्या विकास प्रक्रियेत अडथळा आणून कोरेगाव शहराची नाहक बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
  यावेळी त्यांनी रमेश उबाळे हे केवळ कोरेगावातच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर आक्षेप घेऊन खोटी आंदोलने करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते प्रशासनास वेठीस धरत आहेत. आजवर त्यांनी अधिकाऱ्यांवर केलेले आरोप व केलेली वेगवेगळी आंदोलने पाहता त्यांचा काय दृष्टिकोन असू शकतो, हे संपूर्ण सातारा जिल्ह्याला सर्वज्ञात झाले असल्याचेही या पदाधिकारी व नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.
  कोरेगाव शहरात सुरू असलेल्या विकास कामांची जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र पथकामार्फत पाहणी करावी, विकासकामांमध्ये चुकीचे काही आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी, मात्र अनेक वर्षात कोरेगाव शहरात झाली नव्हती एवढी मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असल्याने यामध्ये चुकीचे काही निदर्शनास न आल्यास रमेश उबाळे यांच्यावर  कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, त्याचबरोबर कोरेगाव नगरपंचायतीची आणि संपूर्ण शहरांची नाहक बदनामी थांबवण्यासाठी संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
  यावेळी पदाधिकारी व नगरसेवकांनी सर्व वस्तुस्थिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्य सरकार व जिल्हा परिषद आपल्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही नागेश पाटील यांनी दिली.
  बदनामी न थांबवल्यास वेळ प्रसंगी गुन्हा दाखल करणार नगराध्यक्षा: दिपाली महेश बर्गे
  मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात ४०० कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. ही सर्व कामे दर्जेदार सुरू असून रमेश उबाळे हे जाणीवपूर्वक आंदोलन करून शहराची बदनामी करत आहेत. त्यांनी बदनामीचे सत्र न थांबवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. वेळप्रसंगी शहरातील बदनामी केली म्हणून त्यांच्या गुन्हा दाखल करू, असा इशारा नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे यांनी दिला.
  चौकट :
  रमेश उबाळे यांच्या आंदोलनामागील बोलवता धनी वेगळाच – उपनगराध्यक्ष सुनील बर्गे
  कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान सर्वसामान्य मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरी अथवा तांत्रिक मान्यता न घेता आचारसंहिता कालावधीत निकृष्ट दर्जाची विकासकामे केली होती. विशेष करून प्रभाग क्रमांक १७ मध्ये अशी कामे झाले आहेत. नगरपंचायतीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विकास आघाडीची सत्ता आल्यामुळे आपली बिले निघणार नाहीत, या विवंचनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर मोठा दबाव आणून बिले काढण्याची मागणी केली, मात्र कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता अथवा तांत्रिक मान्यता नसताना बेकायदेशीररित्या केलेल्या विकासकामांची बिले काढण्यास स्पष्ट नकार देत असलेल्या मुख्याधिकारी दबावाला बळी पडल्या नाहीत. मुख्याधिकाऱ्यांनी काटेकोर भूमिका घेतल्यानेच रमेश उबाळे यांनी  वेगळ्याच मार्गाने आंदोलन करत कोरेगाव शहराची बदनामी सुरू केली आहे. रमेश उबाळे यांच्या आंदोलनामागील बोलविता धनी वेगळाच असून त्यांच्या आंदोलनस्थळी केवळ मोजकेच लोक आहेत. सर्वसामान्य जनतेचा या आंदोलनाला अजिबात पाठिंबा नाही. ठराविक ऑफिसमधून आंदोलनाच्या ठिकाणी जावे म्हणून निरोप दिले जातात, असा आरोप सुनील बर्गे यांनी केला. रमेश उबाळे यांचा कोणत्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय नाही, तरीदेखील ते आपल्या पत्नीच्या सरकारी नोकरीतील पदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ज्ञात स्त्रोत्रापेक्षा अन्य मार्गाने जास्त उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्या मालमत्तेची जरूर ती चौकशी झालीच पाहिजे. सातारा शहरानजिक खेड ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या उबाळे यांच्या बेकायदेशीर इमारत बांधकामाची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे. सातारा जिल्ह्यात आंदोलना बाबतीत सुपारी बहाद्दर असलेल्या रमेश उबाळे यांनी आजवर केलेल्या आंदोलनांची आणि त्यानंतरच्या बदललेल्या भूमिकेची, केलेल्या सेटलमेंटची निपक्षपातीपणे चौकशी करून त्यांचा खरा चेहरा समाजापुढे आणला पाहिजे, अशी मागणी सुनील बर्गे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.