कार्तिकी यात्रेला भाविकांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार : सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर

मंदिर समितीची बैठक संपन्न

    पंढरपूर : कार्तिकी एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता राज्याचे मा.उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे. कार्तिक यात्रा कालावधी दि.14 नोव्हेंबर 2023 ते दि.27 नोव्हेंबर 2023 असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरांचे पालन करून, भाविकांना आवश्यक व पुरेसा प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

    कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने आज मंदिर समितीची दिनांक 03 ऑक्टोंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री. भास्करगिरी बाबा, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, श्री.अतुलशास्त्री भगरे गुरुजी हे समक्ष व ह.भ.प.शिवाजीराव मोरे हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तसेच कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

    परंपरेनुसार दि.16 नोव्हेंबर 2023 ते दि.01 डिसेंबर 2023 या कालावधीत 24 तास दर्शन, शासकीय महापूजेचे नियोजन, दर्शनरांग व्यवस्थापन, लाईव्ह दर्शन व्यवस्था, आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्था, देणगी व्यवस्था, निवास व्यवस्था, भाविकांची अपघात विमा पॉलीसी, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, लाडूप्रसाद व्यवस्था, मोफत चहा व खिचडी वाटप व इतर अनुषंगीक व्यवस्था भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    याशिवाय, आषाढी यात्रा 2023 मध्ये उत्कृष्ट सेवा केलेले अपर जिल्हाधिकारी.तुषार ठोंबरे व विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या व्यवस्थापनावरील खर्च दान निधीच्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यावरून 25 टक्के करण्याबाबतचा शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच मंदिर समितीकडील सर्व ई निविदा यापूढे शासनाच्या https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून मागविण्यात येणार आहेत. त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.