gulabrao patil and neelam gorhe

प्रश्नोत्तराच्या तासाला सत्ताधारी पक्षातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आवेशात उभे राहून बोलण्याने उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe Vs Gulabrao Patil) यांनी गुलाबरावांची चांगलीच कानउघडणी केली.

    मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. प्रश्नोत्तराच्या तासाला सत्ताधारी पक्षातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आवेशात उभे राहून बोलण्याने उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe Vs Gulabrao Patil) यांनी गुलाबरावांची चांगलीच कानउघडणी केली. त्यांना ताकीदही दिली. पाटील आवेशात बोलत असल्याने गोऱ्हेंनी त्यांना हे सभागृह आहे खाली बसा असे सुनावले.

    गुरूवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे आमदार अनिल परब बोलत असताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात खाली बसून बोलण्यास सुरुवात केली. त्यावर परब यांनी आक्षेप नोंदवला. त्यावर पाटील यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तेव्हा, पाटील यांनी प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी मागील कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू लागले. यामुळे नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना खाली बसण्याची विनंती केली. मात्र, पाटील आक्रमक होऊन बोलतच राहिले, यामुळे नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना मंत्री महोदय आपण ताबोडतोब खाली बसा, ही बोलण्याची पद्धत नाही, तुमच्या विभागाचा विषय काढलेला नाही, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, मागच्या कॅबिनेटमध्ये कोण काय करत होते? हा मुद्दा इथे कशाला काढता? तुम्ही ताबडतोब खाली बसा. सभागृहात वागायची ही पद्धत नाही. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का?  चौकात आहात का तुम्ही?” असा संताप व्यक्त करत नीलम गोऱ्हे यांनी पाटीलांना ताकीद दिली.

    मंत्री असाल घरी
    आपण मंत्री आहोत आणि आपण कोणतीही दादागिरीची भाषा केलेली नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करत तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल, सभागृहात बोलण्याची ही पद्धत नाही आहे तुम्ही ताबडतोब खाली बसा, छातीवर हात बडवून काय बोलता ? खाली बसा, अशा शब्दांत नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना सुनावले.