Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation

  पुणे : धुलीकणांवर नियंत्रण करण्यासाठी उपाययाेजना न करणाऱ्या नऊ बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने नाेटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे राडाराेडा वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

  शहरातील वायू प्रदूषणाविषयी चिंता

  सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील वायू प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली हाेती. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या राज्य सरकार आणि महापालिकांनी नियमावली जाहीर केली. शहरात सूक्ष्म धुलिकणांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने उपाययोजना जाहीर केल्या. यात बांधकामे तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ उडणार नाही. यासाठी नियमावली लागू केली. मात्र, या नियमावलीचे पालन संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून हाेत नसल्याचे आढळून आले आहे.

  आता प्रशासनाकडून कठाेर भूमिका

  यामुळे आता प्रशासनाकडून कठाेर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. नऊ बांधकाम व्यावसाियकांना नाेटीस दिली आहे. बांधकामाच्या ठिकाणी बाजूने पत्रे न उभारणे, धुळीचा प्रवास राेखण्यासाठी हिरवे कापड न लावणे आदी उपाययाेजना न केल्यामुळे या नाेटीस दिल्या गेल्या आहेत. तसेच, बांधकामाच्या ठिकाणाहून राडाराेडा, खाेदकाम केल्यानंतरचा मुरुम, माती आदींची वाहतूक करणाऱ्यांनी ताे झाकून नेला नाही तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. संबंधित बांधकाम व्यावसाियकांना नाेटीस पाठविल्यानंतर त्यांनी उपाययाेजना केली नाही तर कठाेर कारवाई त्यांच्यावर केली जाणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले.

  रस्ते स्वच्छतेवेळी पाणी वापरणे आवश्‍यक
  दरम्यान, रस्ते स्वच्छतेवेळी पाणी वापरणे आवश्‍यक असताना खर्च वाचवण्यासाठी ठेकेदरांकडून वर्दळीच्या रस्त्यांवर धूळ उडवली जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ठेकेदारास सूचना दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. तसेच, हे प्रकार न थांबल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  धायरी फाटा ते नवले हॉस्पिटल रस्त्याची दुरुस्ती

  पथ विभागाच्या ठेकेदारांकडून रस्त्यांची स्वच्छता हवेच्या प्रेशरने केली जात असून, प्रचंड धूळ उडवली जात आहे. धायरी फाटा ते नवले हॉस्पिटल रस्त्याची दुरुस्ती सध्या सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने गुणवत्तापूर्ण रस्ते दुरुस्तीसाठी त्यावरील धूळ बाजूला करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ब्रशर असलेल्या वाहनाने (बुमर) रस्ते साफ करणे आवश्‍यक आहे. पण, ठेकेदार थेट हवेच्या प्रेशरने रस्त्यावर वर्दळ असतानाही धूळ उडवली जात आहे. ही धुळ काढली नाही तर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे हाेत नाही असा दावा पथ िवभागाकडून केला जात अाहे.