आईच्या ऑपरेशनसाठी फोडले शेजाऱ्याचेच घर; आरोपी बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

आर्थिक चणचण आणि आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी चक्क शेजाऱ्याचेच बंद घर फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरी करण्यात आल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

    पुणे : आर्थिक चणचण आणि आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशांसाठी चक्क शेजाऱ्याचेच बंद घर फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरी करण्यात आल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याकडून सव्वा सात लाखांचे दागिने जप्त केले आहेत. शेजारचाच घरफोडी करणारा निघाल्याने पोलीस देखील आवक झाले. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लागला आहे.

    दिपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा नोंद होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार संतोष जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

    दिपकचा पहिलाच गुन्हा आहे. दिपक त्याच्या आईसोबत राहतो. दरम्यान, दिपकची आर्थिक चणचण सुरू होती. तर, दुसरीकडे आईचे आजारपण देखील सुरू होते. आईचे ऑपरेशन करायचे होते. तो बिबवेवाडीतील बहुमजली सोसायटीत सहाव्या मजल्यावर राहण्यास आहे. याच काळात (दि. २८ ऑक्टोंबर २०२३ ते २ ऑक्टोंबर २०२३) शेजारी राहणारे एक कुटूंब त्यांच्या मुळगावी सोलापूर येथे गेले होते.

    ही संधी साधत अज्ञाताने हॉलच्या बाल्कनीच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून पसार झाला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसाकंडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सीसीटीव्ही, बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण अश्या सर्व बाजूंनी चोरट्याचा माग सुरू केला होता.

    पण, गेल्या सहा महिन्यांपासून या गुन्ह्याचा छडा लागत नव्हता. परंतु, चोरट्याचा माग काढणे सोडतील ते कसले पोलीस. पोलीस क्लुप्त्या अन् वेगळी पद्धत वापरत बिबवेवाडी पोलिसांनी अखेर छडा लावला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.