
ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या (Lalit Patil) प्रकरणानंतर आता अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष टास्क फोर्सच्या (Special Task Force) सोलापूरमधील कारवाईनंतर नव्या ड्रग्ज माफियाचे नाव समोर आले आहे.
पंचवटी : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या (Lalit Patil) प्रकरणानंतर आता अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष टास्क फोर्सच्या (Special Task Force) सोलापूरमधील कारवाईनंतर नव्या ड्रग्ज माफियाचे नाव समोर आले आहे. नाशिक पोलिसांच्या हाती लागलेला ड्रग्ज माफिया संशयित सनी अरुण पगारे हा सोलापूरात एमडीचा कारखाना चालविला होता, असे समोर आले आहे.
नाशिकच्या तीन पथकांनी सोलापूरातील मोहोळ येथे जाऊन हा कारखाना उद्धवस्त करत 6 किलो 600 ग्रॅम इतका एमडी पावडरचा साठा जप्त केल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. 7 सप्टेंबर रोजी पोलिसांनी गणेश संजय शर्मा या संशयितास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात पोलिसांनी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ गोविंदा संजय साबळे आणि आतिष उर्फ गुड्या शांताराम चौधरी यांच्याकडून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक केली होती.
तसेच अंमली पदार्थ खरेदी विक्रीचे मोठे जाळे संशयित आरोपी सनी अरूण पगारे व त्याचे साथीदार अर्जुन सुरेश पिवाल, मनोज भारत गांगुर्डे, सुमित अरुण पगारे यांच्यामार्फत चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. कारखाना त्यांनी कोठे सुरू केला, याबाबत पोलिसांना माहिती मिळत नव्हती. त्यावर विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून मॅफेड्रॉन बनविण्याचा कारखाना सोलापूर येथे असल्याची माहिती मिळवली होती. गुन्ह्यातील मुख्य आरोपी सनी पगारे याच्याकडे चौकशी करताच त्याने सोलापूर येथे असलेल्या कारखान्याबाबत माहिती दिली.