ऑक्‍टोबरमध्ये महापालिकेत नवीन कर्मचारी रुजू होणार ; आरक्षणासह पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

पिंपरी महापालिका भवनात दररोज वाजणार राष्ट्रगीत

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. त्यानंतर आरक्षणासह पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील ऑक्‍टोबर महिन्यात १५ तारखेपर्यंत सर्व ३६८ उमेदवारांना विविध पदांवर रूजू करून घेण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

    महापालिकेच्या वेगवेगळ्या १५ पदांसाठी ३६८  जागांसाठी मे महिन्यामध्ये राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रत्यक्षात ५५ हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर ११ पदांसाठी ३५ जागांचा निकाल ७ ऑगस्टला जाहीर करण्यात आला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल ३० जार ५८१ अर्जदार बसले होते. त्यांचा निकाल ३० ऑगस्टला जाहीर करण्यात आला.

    पहिल्या टप्प्यातील निकाल प्रसिद्ध करून आरक्षणासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर नियुक्तीपत्र देऊन त्यांना कामावर रूजू करून घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

    दुसऱ्या टप्प्यातील नोकरी भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होताच समितीसमोर अहवाल देऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल.

    – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग