११४ जागांमधून ओबीसी आणि सर्वसाधारण जागांसाठी नव्याने आरक्षण काढणार : राजेश पाटील

पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आगामी निवडणुकीच्या प्रभागनिहाय लोकसंख्येनुसार जाहीर झालेल्या महिला आरक्षणाच्या 70 जागांपैकी सर्वसाधारण गटासाठी 57 जागांवरील महिलांचे आरक्षण रद्द केले आहे.

  पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आगामी निवडणुकीच्या प्रभागनिहाय लोकसंख्येनुसार जाहीर झालेल्या महिला आरक्षणाच्या 70 जागांपैकी सर्वसाधारण गटासाठी 57 जागांवरील महिलांचे आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे आता 114 जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधाण महिला व पुरूषांचे नव्याने आरक्षण जाहीर केले जाणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना आदेश दिले आहेत.

  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 31 मे 2022 रोजी आरक्षण सोडत जाहीर केली होती. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम पार पडला होता. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 139 असून, त्यानुसार एकूण 46 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये महिलांसाठी अनुसूचित जाती 11 जागा, अनुसूचित जमाती 2 महिला आणि सर्वसाधारण गटासाठी 57 जागांचे आरक्षण काढण्यात आले होते. महिलांसाठी अशा एकूण 70 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, हे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरूष जागांव्यतिरिक्त काढण्यात आले होते.

  आता सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)ला आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या प्रत्येकी 2 आणि 11 जागांव्यतिरिक्त सर्वसाधारण महिलांचे 57 जागांसाठीचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. त्यामुळे आता सर्वसाधारण पुरूष-महिला अशा एकूण 114 जागांसाठी नव्याने सोडत काढावी लागणार आहे. त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिला आहे. त्यानुसार 29 जुलै रोजी सर्वसाधारण महिला व पुरूष, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरूष अशा 114 जागांचे आरक्षण नव्याने जाहीर होणार आहे.

  114 जागांपैकी 38 ओबीसी जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण 50 टक्केच्यावर जाणार नाही, या मर्यादेत सर्वाेच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागास प्रवर्ग यांना जागा राखून राजकीय आरक्षण देण्यात येणार आहे.

  असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

  26 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे.

  29 जुलैला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्यास सोडत काढण्यात येणार आहे.

  30 जुलैला आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर 30 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात येईल.

  5 ऑगस्टला आरक्षण निश्चित प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.