पुण्यातील हॉटेल्स अन् पबसाठी नवी नियमावली जारी; आता रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार

सांस्कृतिक शहरात चालवले जात असलेले पब, रेस्टो बार तसेच बार आणि रूप टॉप हॉटेल त्यासोबतच हुक्का पार्लर व क्लबसाठी पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे.

  पुणे : सांस्कृतिक शहरात चालवले जात असलेले पब, रेस्टो बार तसेच बार आणि रूप टॉप हॉटेल त्यासोबतच हुक्का पार्लर व क्लबसाठी पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. नियमावलीचा भंग करणाऱ्यांवर व अवैध प्रकारांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. याशिवाय बिअर बार, परमिट रुम, रेस्टॉरंटसाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. अमितेश कुमार यांनी यासंदंर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.

  अमितेश कुमार म्हणाले, ‘शहरातील बार, परमिट रुम, रेस्टोरंट, पब, रुफटफ रेस्टॉरंटसाठी १४४ नुसार ऑर्डर काढली जाणार आहे. त्यानुसार, या सर्वांना नोटीस दिली जाईल. तसेच मार्गदर्शक सूचनाही दिल्या जाणार आहेत. तसेच रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहणार आहेत. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्यात येईल.’

  म्युझिक रात्री १० पर्यंतच

  रुफटॅफ व टेरेस हॉटेल यांना मद्य विक्रीची परवानगी नसेल. त्यांना त्याची विक्री करता येणार नाही. जर विनापरवाना दारुची विक्री होत असेल तर कारवाई केली जाईल. तसेच रुफटॉप व टेरेस हॉटेलला परवानगी असली तरी रात्री दहा पर्यंतच म्युजिक व डिजे लावता येईल. जे डिजे कलाकार बाहेरुन येऊन सादरीकरण करणार आहेत, त्यांनी पंधरा दिवस आधी पोलीस आयुक्तालयातून परवानगी घेणे बंधनकारक असेल.

  हॉटेल चालकांना सीसीटीव्ही बंधनकारक

  पुणे शहरातील हॉटेल चालकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये येण्या व जाण्याचा मार्ग तसेच जेथे नागरिकांची ये-जा असते व आतील भागात (वॉशरुम सोडून) सीसीटीव्ही लावावे. याशिवाय हॉटेल चालकांनी दोन डिव्हीआर ठेवावेत. जेणेकरुन एक डिव्हीआर पोलिसांनी तपासणीसाठी नेला तर दुसऱ्या डीव्हीआरमध्ये चित्रीकरण सुरु राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

  बाऊन्सरचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे

  काही हॉटेलमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बाउन्सर ठेवले जातात. मात्र, त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्यांचे मागील दहा वर्षांत कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नसेल अशांची नियुक्ती करावी. तसेच बाऊन्सरांचे क्रिमिनल रेकॉर्ड असेल आणि त्यांना कामावर ठेवायचे असेल तर संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांची परवानगी घ्यावी. हॉटेलमध्ये सिगारेट ओढण्यासाठी स्मोकिंग झोन असणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी सिगारेट ओढता येणार नाही, असेही अमितेश कुमार यांनी सांगितले. अवैधरित्या हुक्काबार चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  १५ दिवसांसाठी आदेश लागू

  शहरात पुढील पंधरा दिवसांसाठी हे आदेश असणार आहेत. लोकांकडून हरकती व सूचना आल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती ईमेल किंवा पोलीस आयुक्तालयात द्याव्यात, असेही आयुक्त म्हणाले.