nitin gadkari

जयेश कांथा उर्फ शाकिर याने 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन केला. पहिल्यांदा शंभर कोटी आणि दुसऱ्यांदा दहा कोटी रुपयांची खंडणी त्याने मागितली होती.

    नागपूर:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना गँगस्टर जयेश कांथा उर्फ शाकीर याने दिलेल्या धमकीच्या प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री झाली आहे. एनआयएचं (NIA) विशेष पथक आज सकाळी नागपुरात दाखल झाले. एनआयएचे डीआयजी विक्रम खलाते आणि एसपी प्रवीण इंगवले या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे पथक सकाळपासून नागपूरच्या पोलीस जिमखानामध्ये नागपूर पोलिसांकडून (Napgpur News) या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यासाठी झोन टू चे उपायुक्त राहुल मदने यांच्यासह धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सकाळपासूनच पोलीस जिमखानामध्ये उपस्थित आहेत.

    जयेश कांथा उर्फ शाकिर याने 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात फोन केला. पहिल्यांदा शंभर कोटी आणि दुसऱ्यांदा दहा कोटी रुपयांची खंडणी त्याने मागितली होती. खंडणी न दिल्यास गडकरी यांना जीवे मारण्याची ही धमकी जयेशने दिली होती. नागपूर पोलिसांच्या तपासात धमकीचे हे कॉल कर्नाटकमधील बेळगाव तुरुंगातून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते नंतर दोन्ही गुन्ह्यांमध्ये युएपीए  लावण्यात आलेला होता.

    नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश उर्फ शाकीरचे संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासह अनेक दहशतवादी संघटनांसोबत असल्याचे समोर आलं. त्यानंतर नागपूर पोलिसांकडून त्याची सूचना महाराष्ट्र तसेच केंद्रीय गृह विभागाला देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह विभागाने या प्रकरणात दहशतवादी संघटनांची भूमिका लक्षात घेऊन एनआयएला देखील समान तपास करण्याची सूचना केली होती. त्यामुळे आज एनआयएचे पथक नागपुरात दाखल झालं आहे.

    बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देश विघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांशी संपर्कात होता. देश विघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचे हे संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होते. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.