सुनील मानेच्या माफीचा साक्षीदार होण्यास एनआयएचा विरोध; अर्ज फेटाळण्याची मागणी

उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर (Antilia House) सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Death Case) प्रकरणाला माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून माफीचा साक्षीदार होण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) विरोध केला आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) अँटिलिया निवासस्थानाबाहेर (Antilia House) सापडलेली स्फोटकं आणि व्यावसायिक मनसुख हिरेन मृत्यू (Mansukh Hiren Death Case) प्रकरणाला माजी पोलीस अधिकारी सुनील मानेकडून माफीचा साक्षीदार होण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) विरोध केला आहे. या प्रकरणात माने इतर आरोपींप्रमाणेच सामील होता. त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी एनआयएने केली आहे.

सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या माने यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज कारागृहातूनच विशेष न्यायालयाकडे केला. त्या अर्जावर न्यायालयाने एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, या प्रकरणाचा तसेच माफीच्या साक्षीदार होण्याच्या अर्जाचा अभ्यास केल्यानंतर मानेची प्रकरणातील भूमिका आणि पुराव्यांच्या तपासणीच्या आधारावर माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जाचे समर्थन करू शकत नाही, असे एनआयएने दोन पानी उत्तरात नमूद केले आहे.

या प्रकरणात मानेचा थेट सहभाग होता आणि त्यामुळे भारतीय दंड संहिता आणि कलम १२० ब,२०१, ३०२, ३६४,४०३, ४६५, ४७१ अंतर्गत गुन्हे माने विरोधात नोंदवण्यात आले असून, यूएपीए कायद्याअंतर्गत कलमाचाही आरोपपत्रात समावेश असल्याचे एनआयएने नमूद केले आहे.

पश्चाताप माफीचा साक्षीदार होण्याचे मूळ कारण

कारागृहात राहिल्यावर केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला म्हणूनच माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे मानेने अर्जात नमूद केले आहे. 26 वर्षांच्या कारकिर्दीत कामगिरीचे चांगल्या पद्धतीने मूल्यांकन केले गेले. केंद्र तसेच राज्य सरकारचे 280 पुरस्कार मिळाले. दुर्दैवाने आणि नकळत आपल्याकडून चुका झाल्या. त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी पीडितांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये सांगण्याचा निर्णय घेतल्याचे मानेने म्हटले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत न्यायालयाकडे माफीची मागणी केली आहे.

वाझेसह अन्य आरोपींचा अर्जाला विरोध

या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेसह अन्य आरोपींच्या वकिलांनी मानेच्या अर्जाला विरोध केला आहे.