सोलापुरातील पीएफआयच्या कार्यकर्त्यावर एनआयएची प्रतिबंधक कारवाई ; ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवरात्रीच्या प्रकरण, शाहीनबाग प्रकरण, रोहिंग्या मुस्लीम प्रकरण चालू सणांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एनआयए एटीएसच्या माध्यमातून राज्यभर छापेमारी करण्यात आली असून सोलापुरात देखील मंगळवारी छापेमारी करण्यात आली.

    सोलापूर : नवरात्रीच्या प्रकरण, शाहीनबाग प्रकरण, रोहिंग्या मुस्लीम प्रकरण चालू सणांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एनआयए एटीएसच्या माध्यमातून राज्यभर छापेमारी करण्यात आली असून सोलापुरात देखील मंगळवारी छापेमारी करण्यात आली. पीएफआय या संघटनेशी संबंधित असलेल्या एका चाळीस वर्षीय इसमाला शहरातील सहारा नगर परिसरातून एनआयएने शहर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

    आसिफ शौकत शेख (वय- ४०, रा. प्लॉट नं. २४, सहारा नगर भाग २, सोलापूर) असे ताब्यात येतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला सोलापूर न्यायालयासमोर उभे केले असता ६ ऑक्टोबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे प्रतिनिधी व पीएफआय कार्यकर्त्यावर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने घोषणाबाजी केल्याने जातीय तणाव निर्माण झाला होता. सोलापूर शहरात ही पीएफआयचे सक्रिय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाल्याने तपास यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुणे येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातदेखील तशाच स्वरूपाचे आंदोलन नवरात्रोत्सवामध्ये करण्याची दाट शक्यता असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन जातीय तणाव निर्माण होण्याची, शक्यता असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता असिफ शेख राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा व सोलापूर शहर पोलिसांनी मंगळवारी पहाटे कारवाई करीत त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. विजापूर नाका पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला, ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.