शिर्डीला समृद्धी, ‘वंदे भारत’नंतर तिसरी भेट; भाविकांसाठी आनंदाची बातमी, शिर्डीत आता…

शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या (Shirdi Darshan) साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत 'नाईट लँडिंग'ची (Night Landing) सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच 'डीजीसीए'कडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे.

    मुंबई : शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या (Shirdi Darshan) साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत ‘नाईट लँडिंग’ची (Night Landing) सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच ‘डीजीसीए’कडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचे आभार मानले आहेत.

    शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू झाली आणि आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत.

    गेल्या काही कालखंडापासून यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा होत होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला आणि आज सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आणखी एक भर विकासात घातली आहे. शिर्डी विमानतळ देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2017 मध्ये सुरु झाले होते. यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे.

    भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च/एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता प्रारंभ होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.