शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह ट्विट प्रकरण, निखिल भामरेला अंतरिम जामीन मंजूर

शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)  सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) केल्याप्रकरणी निखिल भामरेला (Bail To Nikhil Bhamre)  मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला. एका विद्यार्थ्याला महिनाभर कारागृहात ठेवण्याला उत्तेजन देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने भामरेला जामीन मंजूर केला.

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)  सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी महिनाभराहून अधिक काळ अटकेत असलेल्या २२ वर्षीय विद्यार्थी निखिल भामरेला (Bail To Nikhil Bhamre)  मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला. एका विद्यार्थ्याला महिनाभर कारागृहात ठेवण्याला उत्तेजन देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने भामरेला जामीन मंजूर केला.

    नाशिकमधील निखिल भामरे नामक फार्मासिस्ट तरुणाने पवारांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याचे ‘बागलाणकर’ असे युजरनेम होते. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यानंतर, ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरेविरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि १८ मे रोजी त्याला अटक करण्यात आली. नाशिक, ठाणेसह अन्य ठिकाणीही भामरेविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३, १५३ अ, (दोन गटांमध्ये तेढ वाढवणे) ५००, ५०१ (बदनामी), ५०४ (गुन्हेगारी धमकावणे), ५०५, ५०६ इ. कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका भामरेंच्यावतीने करण्यात आली आहे. त्यावर न्या. नितीन जामदार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    एकाच कारणासाठी कारवाईच्या बडगा उगारत एका व्यक्तीविरोधात अनेक एफआयआर नोंदवणे हे सर्वोच्च न्यायालयानेही विविध खटल्यांमध्ये नाकारले आहे. तसेच भामरे यांना कलम ४१अ अतर्गंत नोटीस न बजावता अटक करण्यात आली असल्याचे त्यांच्या वतीने वकील सुभाष झा यांनी बाजू मांडताना नमूद केले. त्यांच्या युक्तिवादाला विशेष सरकारी वकील अरुणा पै यांनी विरोध केला.

    दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ट्विटरवरील ट्विटमुळे विद्यार्थ्याला असे कारागृह ठेवणे योग्य ठरणार नाही. असे स्पष्ट करत खंडपीठाने भामरेला दोन एफआयआरमध्ये अंतरिम जामीन मंजूर केला. अन्य तीन एफआयआरमध्ये त्याला अटकेपासून संरक्षण दिले. तर एका एफआयआरमध्ये भामरेला आधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.