शरद पवारांकडे निलेश लंके आणि वसंत मोरे आले; मात्र फक्त लंकेंनी केला प्रवेश, मोरे का गेले परत?

निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

    पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटातून परतलेले आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. यामुळे आज शरद पवार गटामध्ये निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आज फक्त निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

    पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारीवरुन हा कलह सुरु झाला. अजित पवार यांच्या गटाला राम राम करत लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. अहमदनगरचा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपमध्ये गेल्यामुळे निलेश लंके यांनी शरद पवार गटात सामील झाले. त्यांच्याबरोबर मनसे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरुन नाराज आहेत. दोन्ही नाराज नेते राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतील अशी अपेक्षा होती. मात्र वसंत मोरे हे पक्ष प्रवेश न करता गेले.

    यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले, “मी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती, त्यामुळे मी आलो होतो. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली, शिवसेना नेत्यांशी पण केली. पुण्यात एक वेगळा प्रयोग होऊ शकतो. कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशाप्रकारे उमेदावर असू शकतो हे सांगायला मी शरद पवारांकडे आलो होतो,” असं वसंत मोरे यांनी सांगितलं.

    “मी शरद पवारांना सांगितला आहे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत ते इतर मोठ्या नेत्यांना देखील सांगू शकतात समजू शकतात. पुढील दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन,” असे देखील वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.