निलेश लंकेंनीच निलेश लंकेंविरोधात भरला उमेदवारी अर्ज; अहमदनगरच्या राजकारणात येणार आता ‘ट्विस्ट’

अहमदनगरच्या रिंगणामध्ये निलेश लंके यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर डमी उमेदवार निलेश लंके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    अहमदनगर – सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यामध्ये देखील राजकारण रंगलेले आहे. यंदाच्या निवडणूकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्याचबरोबर सर्व प्रयत्नांनी निवडणूक जिंकण्याची तयारी सुरु आहे. अहमदनगरच्या रिंगणामध्ये निलेश लंके यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर डमी उमेदवार निलेश लंके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे अहमदनगरच्या निवडणूकीमध्ये ट्विस्ट आला आहे.

    अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील उमेदवार निलेश लंके मैदानात उतरले आहेत. तर महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये आता आणखी एक लंके निवडणूक लढवणार आहे. निलेश साहेबराव लंके असे या उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा डमी उमेदवार निलेश साहेबराव लंके अशा व्यक्तीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निलेश लंके नावाचे दोन उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरु आहे.

    शरद पवार आणि अनंत गीते यांचे देखील डमी उमेदवार

    लोकसभानिवडणूकीसाठी सर्व राजकीय खेळी खेळल्या जात आहे. यामध्येच एकाच नावाचे दोन उमेदवार उभे करणे ही खेळी देखील अनेक वर्षांपासून खेळली जात आहे. बारामतीमध्ये देखील शरद पवार नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते उभे आहेत. मात्र, अनंत गीते नावाच्या आणखी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्या विरोधातमध्ये सुनील तटकरी नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.