दादा मला माफ करा, हुंदका देत निलेश लंकेंचा शरद पवार गटाकडून नगर लोकसभा लढवणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिला. शरद पवार गटामध्ये सामील झाले.

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. राजीनामा देताना निलेश लंके म्हणाले, “मतदार संघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो. कारण तुम्ही मला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, पण आपल्याला लोकसभेला सामोरे जायचे असेल तर कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. चार महिने शिल्लक असताना काही कटू निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहे,” असे म्हणत निलेश लंके यांनी आमदारकी सोडून, अहमदनगरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  पुढे बोलताना निलेश लंके यांनी अजित पवार गटावर जहरी टीका केली. लंके म्हणाले, “केवळ माझ्या जवळचे होते म्हणून महसूल विभागातील 47 कर्मचाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या. आजची वेळ निर्णय घेण्याची वेळ आहे. शेपूट घालून बसणारी औलाद आमची नाही. माझ्यावर वारंवार वार करण्याचा प्रयत्न केला. कोणी काही म्हणू पण यंदाची निवडणूक ‘कम से कम दो लाख’ असं म्हणत 2 लाख मतांनी लोकसभा निवडणुक जिंकण्याचा विश्वास शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांनी व्यक्त केला.

  ही निवडणूक जीवन मरणाची आहे

  निलेश लंके म्हणाले, स्व:इच्छेने सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यासाठी ही निवडणूक जीवन मरणाची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे आहेत पण आमच्याकडे माणसं आहेत. तुमचे हॉस्पिटल चालले पाहिजे म्हणून तुम्ही सरकारी रुग्णालयासाठी त्यांनी काहीही केलं नाही, असंही निलेश लंके यांनी नमूद केलं.

  माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांमुळे तुम्हाला का घाम फुटला

  पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, राजकारण मला कोणती प्रतिष्ठा टिकवण्यासाठी करायचे नाही. मी राजकारण सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांमुळे तुम्हाला का घाम फुटला. येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल सर्वसामान्य माणूस काय आहे. रावणाचा अंत झाला तुम्ही कोण आहात? असा सवाल निलेश लंके यांनी विखेंना केला आहे.

  अजित पवार यांच्याबद्दल आपलं मतं आजही चांगलं आहे आणि उद्याही चांगलं राहील. दादांनी राजकारणात मला खूप मदत केली. आपला देश जातीपातीवर बोलायला लागला, आपल्या देशाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी मी शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य ठेवले. या महानाट्याबाबत एका पोलिसांनी आपलं मत व्यक्त केलं तर यांनी(विखे) त्या पोलिसाला निलंबित केले, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.

  लंके म्हणाले, आपल्या कामाला निधी मिळाला तर अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पालकमंत्री (राधाकृष्ण विखे) यांनी केला. आपल्याला जिरवा जिरवी कारायला कुणी आमदार केलं नाही. माझे विरोधक देखील म्हणतात की निलेश लंके यांनी आम्हाला कधी त्रास दिला नाही, असंही निलेश लंके म्हणाले.