निलेश लंकेंनी चुकीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा… ; अजित पवार यांचा इशारा

आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारण वरुन नाराज आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यास ते कायद्यानुसार अपात्र ठरतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

    बारामती : आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारण वरुन नाराज आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र त्यांनी चुकीचा निर्णय घेतल्यास ते कायद्यानुसार अपात्र ठरतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

    बारामती तालुक्यातील विविध विकास कामांची उद्घाटने उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सहभागी होणार असल्याच्या प्रश्नाबाबत अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले.

    यावेळी अजित पवार म्हणाले, आमदार निलेश लंके यांची नाराजी स्थानिक पातळीवरील राजकारणाबाबत आहे. आमच्या एका सहकार्याने आमदार लंके यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी माहितीतील मंत्र्याबाबत नाराजी असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी असे एकत्र लंके यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू.

    वास्तविक पाहता दोन जुलै रोजी आम्ही महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर समोरच्या गटातील नेते विरोधात गेलेल्या एकाही नेत्याला आमच्या गटात घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता निलेश लंके यांना कसे काय बरोबर घेत आहेत, याबाबत विचार करण्याची गरज आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सध्याच्या भूमिकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील हे भाजपचे मोठे नेते आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्षपद दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांची समजूत काढली जाईल.