Nine villages in Koregaon taluka warned of boycott of polls; Anger among the villagers due to the blocking of Dhom Dam water

  सातारा : राजकीय दबावातून धोम डाव्या कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानक थांबवण्यात आल्याने कोरेगाव तालुक्यातील सात गावांनी 7 मे रोजी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कराड उत्तर मतदारसंघातील सुरली, जयपुर, पिंपरी, रहिमतपूर,अंभेरी, साप, कण्हेरखेड, बोरीव, अपशिंगे, वाठार या गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय जाहीर केला असून याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला मतदानाच्या पूर्वसंध्येला सादर करण्यात आले . या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
  अठरा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार
  सातारा जिल्ह्यात मंगळवार दिनांक 7 मे रोजी जिल्ह्यातील अठरा लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे आणि मतदारांनी निर्भय वातावरणात मतदान करावे, असे आवाहनही केले आहे.
  कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार
  एकीकडे मतदानाच्या टक्केवारीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा खळबळ जनक ठरला आहे. धोम कालवा संघर्ष समितीचे प्रमुख नंदकुमार माने आणि सुमारे 100 ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन याबाबतचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.
  गेले सात महिने नऊ गावांचा संघर्ष
  या संघर्षाबाबत बोलताना नंदकुमार माने म्हणाले, धोम धरणाच्या नियमित पाणी आवर्तनासाठी गेले सात महिने नऊ गावांचा संघर्ष सुरू आहे . 29 एप्रिल 2024 रोजी कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही उपोषण केले होते. मात्र, राजकीय दबावातून कोरेगावचे आमदार महेश शिंदे धोम डाव्या कालव्याचे पाणी जाणीवपूर्वक बंद करत आहेत. धोम डावा कालवा उन्हाळी आवर्तन नियमित सुरू असताना दोन महिने पाणी आलेले नाही.
  शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट
  आमदार शिंदे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या नऊ गावांमध्ये धोम डाव्या कालव्याला पाणी नसल्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. ही सर्व गावे कराड उत्तर मतदारसंघांमध्ये येत आहेत, कराड उत्तर मतदार संघाच्या नऊ गावांतील हक्काचे एक एटीएमसी पाणी हे जाणीवपूर्वक कोरेगाव मतदारसंघातील गावांसाठी पळवले जात आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.
  आमच्या पाण्याच्या मागणीचा हा संवेदनशील प्रश्न प्रशासन व राजकीय पातळीवर अद्यापही प्रलंबित आहे. हा प्रश्न न सुटल्यास दिनांक सात मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार घालणार असल्याचा इशारा धोम संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या नऊ गावांमध्ये 3O हजार मतदान आहे त्यामुळे पाणी सोडा आणि मत घ्या अशी थेट भूमिका संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या प्रश्नासंदर्भात संवेदनशीलपणे बैठक लावून त्या प्रश्नाचा निपटारा केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहे.