नवव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे २१ व २२डिसेंबरला जुहू येथे आयोजन ; वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची माहिती

संत साहित्याची माहिती सर्वांना समजावी, तसेच संत साहित्याचा प्रसार व्हावा, त्याचे अनुयायी वाढावेत, यासाठी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील हे दरवर्षी संत साहित्य संमेलन घेतात.

पंढरपूर : नववे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन मुंबईतील जुहू येथे होणार असून या संमेलनाचे अध्यक्ष पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर असतील, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी नुकतीच दिली आहे. संत साहित्याची माहिती सर्वांना समजावी, तसेच संत साहित्याचा प्रसार व्हावा, त्याचे अनुयायी वाढावेत, यासाठी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील हे दरवर्षी संत साहित्य संमेलन घेतात. यंदाचे हे संत साहित्य संमेलनाचे नववे वर्ष असून हे संमेलन जुहू येथे पार पडणार आहे.

या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी स्वतः गायलेले पसायदान या साहित्य संमेलनात ऐकवले जाणार आहे. या संमेलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पन्नास वारकरी महाराज मंडळी उपस्थित राहून संत साहित्याची माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहेत. हे साहित्य संमेलन ऑनलाइन पद्धतीने प्रसारित केले जाणार असल्याने देशातील सर्वांना या संत साहित्य संमेलनाचा माहिती ऐकण्यास मिळेल तसेच आस्वाद घेता येईल, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे. पंढरपूर परिसरातील ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. हरिदास महाराज बोराटे, ह.भ.प. महाराज निवृत्ती महाराज नामदास आदी महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत