अटकेच्या शक्यतेमुळं नितीन देशमुखांनी घेतली कपड्याची बॅग, सुखरूप परत येण्यासाठी पत्नीकडून औक्षण; तर मागील दिड तासापासून देशमुखांची ACB कडून चौकशी सुरु

आमदार नितीन देशमुख यांच्या संपत्तीची उघड चौकशीसाठी नितीन देशमुख एसीबी कार्यालयात हजर झाले आहेत, अमरावती विभागीय  एसीबी कार्यालया बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे.

    अमरावती- शिंदे गटातून (Shinde group) परत आलेले ठाकरे गटातील (Thackeray group|) आमदार नितीन देशमुख (mla Nitin Deshmukh) हे सध्या एसीबीच्या (ACB) रडारवर आहेत. आमदार नितीन देशमुख आज सकाळी दहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच ‘एसीबी’च्या चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीला रवाना झालेत. तर मागील दीड तासापासून अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात देशमुख यांची चौकशी सुरु आहे. माध्यमांना सामोरी जाताना देखमुख म्हणाले की, भाजपच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही, कितीही चौकशी करा, जे गेले त्यांच्या मागे भाजपचा दबाव होता, आम्ही भाजपात जाणार नाही, भाजप हे इंग्रज आहेत, असं आमदार नितीन देशमुख म्हणाले. तसेच चौकशीपूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

    कार्यकर्ते आक्रमक…

    दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांच्या संपत्तीची चौकशीसाठी नितीन देशमुख एसीबी कार्यालयात हजर झाले आहेत, अमरावती विभागीय  एसीबी कार्यालया बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. एसीबी कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी सुरु असून, अमरावती अँटी कॅरप्शन ब्युरो कार्यालया बाहेर ठाकरे गटाचा ठिय्या आंदोलन सुरू आहे.

    कपड्याची बॅग आणि औक्षण…

    आमदार नितीन देशमुख व आपले पती सुखरूप परत यावे म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना ओवाळले. आपल्याला अचानक अटक झाली, तर गैरसोय नको म्हणून त्यांनी कपडे भरलेली एक बॅग सोबत घेतली आहे. त्यांच्यासोबत जवळपास सातशे ते आठशे कार्यकर्ते अमरावतीकडे रवाना झाल्याचे समजते. या प्रकरणी कथित तक्रारदाराची आणि मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप आपल्याकडे असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही, भाजप हे ब्रिटिशांपेक्षा घातक आहेत, असं आ. नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.