एनएमएमटी प्रशासनाची ३ हजाराहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई

या बसेसद्वारे प्रतिदिन २ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. याद्वारे प्रतिदिन ३८ ते ४० लाख रुपये उत्पन्न उपक्रमाच्या तिजोरीत जमा होत आहे

    नवी मुंबई : एनएमएमटी प्रशासनाने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ३ हजार ४०२ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ७ हजार ४०४ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

    नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये खोपोली कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मुंब्रा, मंत्रालय, दादर, पनवेल, खारकोपर आदी ठिकाणी बस सेवा पुरविली जाते. या ठिकाणी ७४ मार्गांवरून दररोज सुमारे ३८० बस प्रवाशांच्या सेवेत दाखल आहेत. या बसेसद्वारे प्रतिदिन २ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. याद्वारे प्रतिदिन ३८ ते ४० लाख रुपये उत्पन्न उपक्रमाच्या तिजोरीत जमा होत आहे. एकीकडे अधिकाधिक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न उपक्रमांकडून केला जात असताना दुसरीकडे या सेवेचा गैरफायदा घेणारे काही समाजकंटकही आढळून आले आहेत. या समाजकंटकांना आवर घालण्यासाठी उपक्रमाच्या माध्यमातून ४० हून अधिक तिकीट तपासणीस प्रतिदिन विविध मार्गांवर सेवा बजावत असतात. त्यानुसार या तिकीट तपासणीसांनी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ३६ लाख ११ हजार ९४० इतक्या प्रवाशांचे तपासणी केली. यामध्ये ३ हजार ४०२ इतके फुकटे प्रवासी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

    दरम्यान साध्या बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना १७५ रुपये आणि वातानुकूलित बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना ३१० रुपये दंड आकारला जात आहे. यापुढेही ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे, अशी माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली आहे.