‘बारामती’ सहानुभूतीच्या लाटेवर की विकासाच्या वाटेवर?; मतदान टक्केवारीत फारसा फरक नसल्याने निकालाबाबत आणखी उत्सुकता

बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणुकीत महाराष्ट्राने पहिल्यांदाच पवार कुटुंबातला संघर्ष पाहिला. बारामतीच्या लढाईमध्ये खडकवासल्याचा आकडा निर्णायक ठरेल, असे अनेक जाणकारांकडून सांगितले जात आहे.

  पुणे / दीपक मुनोत : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणुकीत महाराष्ट्राने पहिल्यांदाच पवार कुटुंबातला संघर्ष पाहिला. बारामतीच्या लढाईमध्ये खडकवासल्याचा आकडा निर्णायक ठरेल, असे अनेक जाणकारांकडून सांगितले जात आहे. मात्र, यावेळी खडकवासल्यातील मतदान ना वाढले ना घटले. त्यामुळे इ व्ही एम मध्ये बंद झालेले मतदान सहानुभूतीच्या लाटेवर आहे की विकासाच्या गप्पांना प्रतिसाद हे निकालाच्या दिवशीच ठरणार आहे.

  बारामतीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना झाला. बारामतीच्या या लढतीमध्ये जागा जिंकण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांनी जोरदार प्रयत्न केले.‌आता या लढतीत नेमका कुणाचा विजय होणार हे ४ जून रोजी मतमोजणीत समजणार आहे.

  संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामतीतील नणंद भावजय लढतीत मतदार केंद्रांवर सायंकाळनंतर रांगा लावून मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघामध्ये ५६.७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने दिला आहे.

  बारामतीच्या ६ विधानसभा मतदारसंघापैकी बारामतीमध्ये ६४.५० टक्के, भोरमध्ये ५८.५२ टक्के, दौंडमध्ये ५७.८० टक्के, इंदापूरमध्ये ६२.५० टक्के, खडकवासल्यामध्ये ५० टक्के आणि पुरंदरमध्ये ४८ टक्के मतदान झाले.

  खडकवासलात 50 टक्के मतदान

  खडकवासला मतदारसंघाची भौगोलिक रचना शहरी आणि ग्रामीण भाग अशी संमिश्र आहे. या मतदारसंघाचा ७० टक्के भाग शहरी असून, ३० टक्के भाग ग्रामीण आहे. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. सन २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील अनुक्रमे महादेव जानकर आणि कांचन कुल यांना खडकवासला येथे मताधिक्य मिळाले होते. या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. यंदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बारामतीच्या निवडणुकीत नसल्याने भाजपला मानणाऱ्या वर्गाने कितपत मतदान केले त्यावर या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  खडकवासला विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ४० टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघात झालेलं मतदान आणि यावेळी झालेलं मतदान यात म्हणावा इतका फरक नाही.

  खडकवासलामध्ये एकूण पाच लाख ३८ हजार ३१ मतदार आहेत. या मतदारसंघात यंदा ५० टक्के मतदान झाले असे गृहीत धरल्यास दोन लाख ६९ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचे स्पष्ट होते. यावेळी मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही असे असताना मतदानाची टक्केवारी गेल्या वेळेच्या निवडणुकी होती तेवढीच असल्याने भाजपेतर मतदार अधिक असेल असे गृहीत धरले तरी तो कुणाच्या बाजूने झुकला असेल हे सांगणे तसे अवघड आहे. त्यामुळे विकासाची भाषा पावणार की सहानुभूतीची लाट वाचणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  इंदापूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, कडक उन्हाळा यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली. हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे कट्टर प्रतिस्पर्धी महायुतीसाठी एकत्र आले.‌ हे दोन्ही नेते मतदारांना घराबाहेर पडण्यासाठी दिवसभर मतदारसंघात फिरत होते.

  भाजपचे वर्चस्व असलेल्या दौंड तालुक्यात आजी माजी आमदांनी मतदान केंद्राना भेटी देत पाहणी केली. सुनेत्रा पवार यांना या मतदारसंघात किती मतदान होणार याची ही उत्सुकता आहे. नेहमी पवार कुटुंबाला विरोध करणाऱ्या पुरंदर तालुक्यात बदललेल्या परिस्थितीत कसा प्रतिसाद मिळतो याबाबत ही प्रश्न आहे

  भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात दुपारनंतर मतदानासाठी गर्दी झाली. स्वतः शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतल्यानंतर मतदारांवर त्याचा काय परिणाम झाला हे मतमोजणीत दिसून येईल.

  पवार कुटुंबाचे गेली ५० वर्षे वर्चस्व असलेल्या बारामती तालुक्यात शहर व परिसरात मतदानाविषयी फारशी उत्सुकता दिसली नाही. तरीही सायंकाळी मतदान संपेपर्यंत सर्व मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ६४ टक्के मतदान झाले.

  अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश येणार ?

  बारामतीत शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असला तरी खडकवासला मतदारसंघाच्या शहरी भागात मतदानाची आघाडी घेण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. तथापि, ५० टक्के मतदान झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल याचा अंदाज बांधणे बदललेल्या परिस्थितीत अवघड होऊन बसले आहे.