“नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची”, झुकेगा नही साला… आपल्याच सरकार विरोधात बच्चू कडूंनी ठोकला शड्डू

मोर्चाच्या निमित्ताने बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यानी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोरच हटके बॅनर्स लावले आहेत. "नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची, बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात “झुकेगा नही साला”… असं या बॅनर्सवर मजकूर लिहिलं आहे.

    अमरावती : राज्यात जून २०२२ साली सत्तांतर झाले. यानंतर ठाकरे गट व शिंदे गट अनेकवेळा आमनेसामने आले. शिंदे गटाला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही पाठिंबा दिला. कडू हे आक्रमक आमदार म्हणून समजले जातात. दरम्यान, मंत्री मंडळ विस्तार यावर त्यांनी अनेकवेळा सरकारला घरचा अहेर दिला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. बच्चू कडू यांनी आज अमरावतीत जन एल्गार मोर्चाची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चात एकूण 10 मागण्या करण्यात येणार आहे. अमरावतीनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे मोर्चे काढण्यात येणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. अमरावतीतील संत गाडगेबाब यांच्या समाधीपासून मोर्चाची सुरूवात होणार आहे. या मोर्चात 10 ते 15 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

    शेतकऱ्यांना शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत मदत मिळावी

    दरम्यान, शेतीची पेरणी ते कापणीपर्यंतची कामं मनरेगातून व्हावीत, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळावं, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावं, अशा विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. जन एल्गार मोर्चाची हाक बच्चू कडू यांनी केली आहे. याबाबत शहरात मोठे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. यावरील मजकूर सरकारला इशारा देण्यात आला आहे.

    झुकेगा नही साला…सत्तेची परवा नाही

    मोर्चाच्या निमित्ताने बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यानी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोरच हटके बॅनर्स लावले आहेत. “नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची, बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात “झुकेगा नही साला”… असं या बॅनर्सवर मजकूर लिहिलं आहे.  त्यामुळे सध्या हे पोस्टर्स हटके व आकर्षक असून चर्चेचा विषय ठरत आहेत.