मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना योग्यच, फक्त दिसणारे नको तर टिकणारे आरक्षण हवे : डॉ. प्रिया महेश शिंदे

मराठा समाजाचे सर्वच बाजूने शोषण झाले आहे. नवीन पिढीला नोकर्यां मध्ये देखील हक्काचे आरक्षण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. मराठा आरक्षण ही मागणी न्याय व योग्य आहे, त्याचबरोबर ती हक्काची आहे.

    कोरेगाव : मराठा समाजाचे सर्वच बाजूने शोषण झाले आहे. नवीन पिढीला नोकर्यां मध्ये देखील हक्काचे आरक्षण मिळणे ही काळाची गरज बनली आहे. मराठा आरक्षण ही मागणी न्याय व योग्य आहे, त्याचबरोबर ती हक्काची आहे. सरकारने फक्त दिसणारे नको तर टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, अशी समाजबांधवांची मागणी आहे, त्याला आमचा समाजातील एक घटक म्हणून निश्चिात पाठिंबा आहे, अशी माहिती काडसिध्द कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी दिली.

    कोरेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोमवारी डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी भेट दिली. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कुमठे येथील समाजबांधव आज उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली व पाठिंबा दर्शविला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या कोरेगाव तालुकाध्यक्ष पल्लवी दीपक शिंदे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, नगरसेविका शीतल बर्गे, वनमाला बर्गे, संजीवनी बर्गे, स्नेहल आवटे, सुवर्णा फडतरे, धनश्री बर्गे, उज्ज्वला बर्गे यांच्यासह माहिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

    मराठा समाजातील एक घटक या नात्याने आम्ही मराठा आरक्षणाबाबत कायम भूमिका घेतली आहे. सर्व समाजबांधवांना हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न आहेतच, त्यासाठी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. सरकारने पूर्ण तयारीनिशी टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आमची देखील मागणी असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.