म्हणे आपलं सरकार! गणपती बाप्पा आले आणि CM साहेब त्याच्या भजनी एवढे लागले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट रोजी झाला. १८ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आणि या नव्या मंत्र्याची पहिली बैठक १० ऑगस्ट रोजी झाली. त्यानंतर राज्य विधिमंडळाने पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात विरोधकांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला धारेवर धरले.

  मुंबई : राज्यात अतिवृष्टीने (Heavy Rain) पुन्हा थैमान घातले आहे अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी नुकसानग्रस्त, पूरग्रस्त ठिकाणी मदतीचे आदेश देण्याचे गरज असताना मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त आणि शेतकरी वाऱ्यावर असे चित्र राज्यात दिसत असल्याची टीका होत आहे. त्यातच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर (After Maharashtra Assembly Session) राज्यमंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नसून (No Meetings) कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आले नसल्याने शिंदे सरकारविरोधात (Shinde Government) नाराजी पसरली आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट रोजी झाला. १८ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली आणि या नव्या मंत्र्याची पहिली बैठक १० ऑगस्ट रोजी झाली. त्यानंतर राज्य विधिमंडळाने पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात विरोधकांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सरकारने काही विषयाबाबत आमदारांची बैठक घेण्यात येईल तर काही प्रश्नांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले.

  राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ ऑगस्टला स्थगित झाले. त्यानंतर लगेचच ३१ ऑगस्टला राज्यात श्री गणेशाचे आगमन झाले. गणेशोत्सवानिमित्त मंत्री आपापल्या जिल्ह्यात परतल्याने त्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवानिमित्त विविध राजकीय नेत्यांच्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेटी देण्यास सुरुवात केली.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे आगमन झाल्याने येथे भेट देणाऱ्यांची गर्दी वाढली. एकूणच मुख्यमंत्री शिंदे गणेश मंडळांना भेटी देण्यात आणि घरी येणाऱ्यांचे स्वागत करण्यात गुंतले. परिणामी दर आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक दोन आठवडे झालीच नाही. तर, अधिवेशनात आमदारांना बैठक घेण्याचे दिलेले आश्वासनही हवेत विरले.

  पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांच्या या लोकप्रिय घोषणेनंतरही मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आनंद झाला. गणपतीसारख्या सणासुदीत मदत मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱयांचा मात्र भ्रमनिरास झाला. गणपतीमुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी सुट्ट्या टाकून पसार झाले. उरलेले अधिकारी, कर्मचारी मंत्रालयात मंत्रीच येत नसल्याने सुस्तावले आहेत तर मुख्यमंत्री गणपती मंडळांना भेटी देण्यात व्यस्त आहेत.

  राज्यात पुन्हा पावसाने थैमान घातले असून काही ठिकाणी पुन्हा पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी मुख्यमंत्री, मंत्री यांनी मंत्रालयात उपस्थित राहून अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्याची आवश्यकता असताना मुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त तर शेतकरी वाऱ्यावर अशी विदारक परिस्थिती दिसत असल्याची टीका होऊ लागली आहे.