काॅंग्रेसमध्ये विलीनीकरण नाही; शरद पवार गटातील नेत्यांकडून भूमिका स्पष्ट

राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही, असे पक्षाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 14) पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षाचे चिन्ह, पक्ष या विषयावर चर्चा झाली.

  पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन केला जाणार नाही, असे पक्षाच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 14) पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षाचे चिन्ह, पक्ष या विषयावर चर्चा झाली. महाविकास आघाडीची पुण्यात २४ फेब्रुवारीला सभा हाेणार असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.

  राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष काॅंग्रेस पक्षात विलीन केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पक्षाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीस खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे, अशोक पवार, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

  काॅंग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरण करण्यासंदर्भात काेणतीही चर्चा नसून ज्यांना शरद पवार यांची भीती वाटत आहे तेच लोक ही अफवा पसरवत असल्याचे यावेळी या नेत्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत पक्षाचे नाव, चिन्ह आणि आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

  माजी मंत्री देशमुख म्हणाले,‘ काँग्रेसमध्ये पक्षाचे विलीनीकरण होणार नाही. ही अफवा आहे. महागाई त्याचबरोबर चिन्ह आणि मेळावा यावर आज चर्चा झाली आहे. काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार अशा बातम्या कुठून येतात माहिती नाही. असे काहीही होणार नाही.’

  आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील विलीनीकरणाच्या चर्चेत तथ्य नसल्याचे नमूद केले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडीची येत्या २४ तारखेला पुण्यात सभा होणार असल्याचे नमूद केले. नवीन नाव चिन्ह घेऊन आम्ही सामोरे जाऊ तसेच २४ फेब्रुवारीला पुण्यात इंडिया आघाडीचा पहिला मेळावा होणार आहे. लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली आहे, असं यावेळी त्यांनी सांगितले.

  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अराेग्याची काळजी घेतली पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत भाजप कधीही ठोस निर्णय घेत नाही ते नेहेमी दिशाभूल करत असतात. मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपच्या काही नेत्यांकडून सदावर्ते यांना पुढे करून विरोध करण्यात आला. 2024 नंतर भाजप सत्तेत आल्यावर कुठले आरक्षण राहिल असे वाटत नाही.

  - आमदार राेहीत पवार

  देशातील शेतकरी हा खूप संवेदनशील आहे. त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाल्यानंतरच ते आक्रमक होतात. सरकारकडून अन्याय केला जात आहे. अन्नदात्यावर जर अन्याय केला तर याची मोठी किंमत सरकारला मोजावी लागणार आहे. तसेच राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार हे आरक्षणाच्या बाबतीत फेल ठरले आहे.

  - खासदार सुप्रिया सुळे