हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही – भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात

सर्व गुंडाळून विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे बसले त्याचवेळेला त्यांनी हिंदुत्व, देश-धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच गमावला आहे.

  मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा आज भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. आपल्या देवदैवतांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काय भुमिका घेतलीय हे सर्वश्रुत आहे. सर्व गुंडाळून विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे बसले त्याचवेळेला त्यांनी हिंदुत्व, देश-धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच गमावला आहे. म्हणून संजय राऊत वैफल्यातून ग्रासलेले आहेत, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली.

  पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, राहुल गांधी निष्प्रभ आहेत. त्यांचा प्रभाव पडणार नाही. त्यांनी कितीही सभा, यात्रा घ्या मात्र या देशातील जनतेने ठरवले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा या देशाचे नेतृत्व करावे. कारण गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी ज्या उंचीवर देशाला नेले आहे ते देशाची जनता पाहतेय. पंतप्रधान मोदींच्या तुलनेत राहुल गांधी आजूबाजूलाही पोहोचू शकत नाही एवढं उत्तुंग आणि या देशातील जनतेसाठी विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदी आज प्रस्थापित झालेले दिसत आहेत.

  लोकसभा निवडणुकीवर बोलताना दरेकर म्हणाले की, भाजपा प्रक्रिया करून उमेदवाऱ्या देणारा पक्ष आहे. कुठल्या हायकमांडला वाटले म्हणून हा उमेदवार, कोणीतरी कोणाबरोबर आहे म्हणून त्याला उमेदवारी असे न करता जनतेच्या मनात त्या उमेदवाराविषयी काय आहे याचे वेगवेगळ्या पातळीवर मूल्यमापन करत भाजपा उमेदवारीचे निकष ठरवत असते. वेगवेगळे प्रयोग निवडणुकीत होत असतात. त्यामुळे पारदर्शी प्रक्रिया भाजपात असते त्यावर उमेदवारी ठरत असते. जनतेला जे हवेय ते देण्याचा आमचा प्रयत्न असतो. उमेदवार छोटा-मोठा यापेक्षा पक्षाशी बांधील कोण आहे, देशाच्या विकासासाठी कोण कामं करू शकते यावर मूल्यांकन होते.

  अंबादास दानवे यांनी केलेल्या ट्विटबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, दानवे यांनी आतातरी विरोधी पक्षनेता झाल्यावर प्रगल्भ व्हायला पाहिजे. परंतु अजून ते अभ्यास न करता, बालिशपणाचे बोलत असतील तर ते दुर्दैवी आहे. कुठलीही गुंतवणूक यायला काही कालावधी लागत असतो. महाविकास आघाडीने दोन-अडीच वर्ष राज्य केले. गुंतवणूकीची प्रक्रिया दोन-अडीच वर्षात सुरू आणि संपते का? त्यामुळे दानवे अभ्यास न करता निराधार बोलत असतात, असा टोलाही दरेकरांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पूर्ण अभ्यास आहे. मुख्यमंत्री असताना मागील पाच वर्षात त्यांनी गुंतवणूकीच्या दृष्टीने जे काही संबंध प्रस्थापित केले होते ते दोन-अडीच ठप्प होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर पुन्हा त्यांनी गती पकडली. एक-दीड वर्षात गुंतवणूक येते किंवा कारखाना उभा राहत नसतो.

  एकनाथ खडसे यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, आयजीच्या जीवावर बायजी उधार असे म्हणून खडसेंनी पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची आहे. कायद्याच्या चौकटीत कोर्टात टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. जरांगेंचे आंदोलन होण्यापूर्वीच मराठा समाजाच्या पदरात काहीतरी सकारात्मक पडेल अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी अपार कष्ट करणारे नेते आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असूनही गावावाड्या वस्त्यांतील जनतेची काळजी करणारे ते नेते आहेत स्वतः एसीत बसून देश चालवणारे नेते नाहीत. जाणसामान्यांत जास्तीत जास्त जाऊन त्यांची नाळ जोडणारे नेतृत्व आहे. म्हणून त्यांचे हे दौरे असल्याचेही दरेकर म्हणाले.

  राहुल गांधी यांच्या पोस्टरला काळे फासण्यावरून काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्याच कार्यकर्त्यांची चौकशी केली पाहिजे. तेच राहुल गांधी यांच्या पोस्टरला काळे फासतील आणि भाजपावर दोष देण्याचा प्रयत्न करतील. याची चौकशी झाली पाहिजे आणि हे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.