भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद; गोपीचंद पडळकर यांचा विश्वास

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद देखील साधला आहे.

    नाशिक : लोकसभा निवडणूकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ देखील चर्चेच्या वर्तुळामध्ये राहिला आहे. नाशिकमधून अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या. मात्र नंतर त्यांनी यातून माघार जाहीर केली. त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हे केंद्रस्थानी राहिले आहेत. यानंतर आता धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद देखील साधला आहे.

    नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेबांना भेटलं पाहिजे

    यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता. या मेळाव्याच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो होतो. आज महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. भेटीचे विशेष कारण नाही कारण ते आमचे नेते आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेबांना भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेने मी त्यांना भेटलो. महायुती लोकसभा निवडणूक ताकतीने लढते आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते भुजबळ साहेब आहे त्यामुळे अनेक नेते त्यांना भेटतात. मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतात ती वेगळी भेट असते,” असे मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले.

    भुजबळांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही

    छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या विषयावेळी ओबीसी समाजाची बाजू मोठ्या जोराने लावून धरली होती. त्यानंतर आता पडळकर यांनी देखील भुजबळ यांच्या ओबीसी समाजाशी असणाऱ्या संपर्काबद्दल पुर्नोच्चार केला. पडळकर म्हणाले, “छगन भुजबळ यांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहे. भुजबळ साहेबांनी मी निवडणूक लढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. ओबीसींची ताकद तीच आहे आणि ही ताकद पुढे वाढेल,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.