कुणाला माहिती नाही, पण माझ्यामागेही ईडी; धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा

"अनेकांचे जसे खटले सुरु आहेत तसे माझेही सुरु आहेत. एकनाथ खडसेंनी माझी ईडी सुरु असल्याचं म्हटलं. नाथाभाऊंसारखा माझाही ईडीचा त्रास सुरु आहे. पण कोणाला माहिती नाही", असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला.

    जळगाव : ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि नेत्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. ईडीचा ससेमीरा असणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील आहेत. त्यांनी जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलं. या कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी आपल्यामागेदेखील ईडीचा ससेमिरा असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

    धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

    “अनेकांचे जसे खटले सुरु आहेत तसे माझेही सुरु आहेत. एकनाथ खडसेंनी माझी ईडी सुरु असल्याचं म्हटलं. नाथाभाऊंसारखा माझाही ईडीचा त्रास सुरु आहे. पण कोणाला माहिती नाही”, असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. धनंजय मुंडे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. या दरम्यान पारोळा तालुक्यातील इंदवे येथे कार्यक्रमात बोलताना मुंडेंनी ईडीबाबत गौप्यस्फोट केला. पण ईडीची किंमत बीडी तितकी सुद्धा राहिली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

    तसेच पुढे बोलताना मुंडे म्हणाले, “ओबीसी आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय न घेता उलट महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे”, अशी जोरदार टीका धनंजय मुंडे यांनी जळगावात केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना आरक्षण देण्यावरून हे सरकार उघडे पडले असल्याची टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.