राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं आश्वासन

दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने राज्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिक्षक संघटनांच्या बैठकीत दिले.

    गडहिंग्लज : दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने राज्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिक्षक संघटनांच्या बैठकीत दिले. तसेच राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नसून शिक्षण क्षेत्राचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नाही, अशी अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.

    बालभवन, मुंबई येथे केसरकर, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसचिव व राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांची शैक्षणिक प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, दत्तक शाळा योजना ही जिल्हा परिषदांच्या शाळातील फक्त भौतिक सुविधा सुसज्ज करण्याच्या हेतूने आणली असून, दत्तक घेणाऱ्या कंपनीचा प्रशासनात कोणताही हस्तक्षेप असणार नाही.

    राज्यात कंत्राटी शिक्षक नेमणुकीबाबत शालेय शिक्षण विभागाचे कोणतेही धोरण नसून राज्यात एकही कंत्राटी शिक्षक नेमणूक होणार नाही. समूह शाळा योजनेबाबत शासन स्तरावर फक्त माहिती संकलन केली जात आहे. वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.