ध्वनि प्रदूषण नोंदविणार! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून १८ ठिकाणी होणार मोजणी

    पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत होणाऱ्या आवाजाची मोजणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून १८ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण गणेशोत्सवात पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी या नोंदी घेतल्या जाणार आहेत. पुण्यासह राज्यभरातील २२ शहरांमध्ये १३२ ठिकाणी ही नोंद घेतली जाणार आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक ठिकाणे असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिली.

    दरम्यान, गेल्या सात ते आठ वर्षांपासून या नोंदी घेतल्या जात आहेत. या वर्षी पुण्यात पाच ठिकाणांची वाढ करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. या नोंदीच्या आधारावर भविष्यात प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना करता येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी घेतलेल्या नोंदीत सर्वाधिक आवाज महात्मा फुले मंडई परिसरात तब्बल ९७.६ डेसिबल असून दुसऱ्या क्रमांकावर कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आहे. या ठिकाणी सुमारे ९६.९ डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे.

    या ठिकाणी होणार आवाजाची मोजणी…
    महामंडळाकडून शांतता, औद्योगिक आणि निवासी क्षेत्र अशा तीन ठिकाणी सकाळी आणि रात्री होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजली जाईल. पुण्यात महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रस्ता (शगुन चौक), कर्वे रस्ता (नळस्टॉप), कोथरूड (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा), शिवाजीनगर (साखर संकुल), सातारा रस्ता (बालाजीनगर), शनिवार पेठ (शनिवारवाडा), येरवडा (गुंजन चौक), स्वारगेट (टिळक रस्ता), हडपसर (भाजी मंडई), आचार्य आनंद ऋषी चौक (विद्यापीठ चौक), खडकी बाजार, महात्मा गांधी मार्ग (बाबाजान चौक), सारसबाग (मित्रमंडळ चौक), विश्रांतवाडी, पर्वती, कोरेगाव पार्क, औंध (परिहार चौक).