नागपुरात एक-दोन नव्हे तर तब्बल 8000 कोंबड्यांची करण्यात आली कत्तल; कारण आहे तसंच, जाणून घ्या…

राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून, गेल्या काही दिवसात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये 8501 कोंबड्यांना मारण्यात आले.

  नागपूर : राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून, गेल्या काही दिवसात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये 8501 कोंबड्यांना मारण्यात आले असून, जवळपास 16 हजारांवर अंडीही नष्ट करण्यात आले आहेत.

  नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे त्यांनीही मान्य केले आहे. या घडामोडीत अंडी उबवणी केंद्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठविले आहे.

  सर्वप्रथम 4 मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच ‘एवियन इन्फ्लुएंजा’ची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले.

  दरम्यान, राज्य सरकारने नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व नियमांचे पालन करत कोंबडघ्य आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावाही केला आहे.

  राज्य सरकारच्या ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला, त्याच्या एक किमीच्या परिघात पशु वैदयकीय विद्यापीठाचाही पोल्ट्री फार्म असून, तिथल्या 260 कोंबड्यांनाही मारण्यात आले आहे.

  इतरत्र कुठेही उद्रेक नाही

  दरम्यान, राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही पोल्ट्री फार्मवर सध्या बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याची माहिती समोर आलेली नाही, असा दावाही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केला आहे.