पुणे शहरातील १५ सीबीएसई शाळांना शिक्षण विभागाकडून नोटिसा; जाणून घ्या नेमकं कारण काय?

पुणे शहरातील अनेक सीबीएसई इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सरल विद्यार्थी आधार अद्ययावतीकरण, ‘यू-डायस प्लस’मध्ये पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थी संख्या नमूद केलेली नाही. शहरातील अशा १५ शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

  पुणे : पुणे शहरातील अनेक सीबीएसई इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सरल विद्यार्थी आधार अद्ययावतीकरण, ‘यू-डायस प्लस’मध्ये पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थी संख्या नमूद केलेली नाही. शहरातील अशा १५ शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

  ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र सरकार समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक, नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हे, स्कूल एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन इंडेक्स निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजन करणार आहे. त्यासाठीच राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमध्ये टप्प्याटप्प्याने भरण्याची सूचना दिली होती. मात्र, शहरातील ११७ हून अधिक शाळांनी ही माहिती भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी संपूर्ण माहिती अद्याप भरलेली नाही. त्यामुळे, अशा शाळांना शिक्षण विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

  शाळांवर कारवाई होणार

  काही शाळांनी ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमध्ये शाळेच्या पटसंख्येच्या तुलनेत मुलांची संख्‍या कमी नोंदवली आहे. शासनाने वारंवार भरविलेल्या ‘यू-डायस’ शिबिराला एकही दिवस उपस्थिती दर्शवली नाही. या शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी कमी आहे. संबंधित शाळा अजिबात प्रतिसाद देत नसल्याने या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

  या शाळांना नोटिसा

  शहरातील युरो स्कूल, ऑर्चिड स्कूल, एल्प्रो स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, व्हिबग्योर स्कूल, दर्शन अकादमी स्कूल, इक्रा स्कूल, जे.जे. इंग्लिश मीडियम स्कूल, निर्मल बेथनी स्कूल, पूना पब्लिक स्कूल, अराइझ इंटरनॅशनल स्कूल, सरस्वती स्कूल, इंदिरा स्कूल, भगवती स्कूल, ज्यूडसन स्कूल या शाळांनी ‘यू डायस’ प्रणालीमध्ये माहिती भरलेली नाही.

  ‘यू डायस’ ही केंद्राची योजना आहे. शाळांची माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही शहरातील काही खासगी शाळांनी ही माहिती भरली नाही. त्यामुळे, त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

  - संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी.