कोम्बिंग ऑपरेशनमध्ये कुख्यात गुन्हेगार पिस्तूलासह जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान गुन्हे शाखेने एका कुख्यात गुन्हेगाराला पिस्तूलासह जेरबंद केले. बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरत असताना त्याला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून ६० हजारांचे एक गावठी पिस्तूल व एक काडतूस जप्त करण्यात आले आहे.

    पुणे : कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान गुन्हे शाखेने एका कुख्यात गुन्हेगाराला पिस्तूलासह जेरबंद केले. बेकायदेशीर पिस्तूल घेऊन फिरत असताना त्याला पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून ६० हजारांचे एक गावठी पिस्तूल व एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. प्रथमेश उर्फ सोन्या दिपक कदम (वय २४, रा. धायरी गाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अमंलदार दत्ता सोनवणे, आण्णा माने, निलेश साबळे, अजय थोरात, अनिकेत बाबर व त्यांच्या पथकाने केली आहे.

    शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच पाहिजे व फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सूचना दिल्या आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडून पथकांना योग्य ते मार्गदर्शन करून आरोपींना पकडण्याबाबत सांगण्यात आले होते. तसेच, कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची सूचना दिली होती. शहरात बुधवारी रात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

    तेव्हा युनिट एकचे पथक हद्दीत गुन्हेगार चेकिंग करत असताना पथकाला माहिती मिळाली की, एक जण भवानी पेठेतील त्रिकोणी गार्डन येथे उभा असून, त्याच्याजवळ पिस्तूल आहे. लागलीच ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पथकाने याठिकाणी सापळा रचला. तसेच, संशयित प्रथमेश याला पकडले. त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. चौकशीत तो रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश उर्फ सोन्या असल्याचे समजले. त्यानूसार त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.