
पुणे : राज्यातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या येरवडा कारागृहातून कुख्यात गुंड आशिष जाधव पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळदेखील उडाली आहे. तर, कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तत्पूर्वी कारागृहातून तसेच रुग्णालय व न्यायालयात आणताना आरोपी पळून जाण्याच्या घटनांत वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आशिष जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत येरवडा कारागृह विभागाने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार आहे. खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आले होते. सोमवारी दुपारी तुरुंग अधिकारी नेहमीप्रमाणे कैद्यांची मोजणी करीत होते. तेव्हा त्यांना आशिष जाधव दिसून आला नाही.
आशिष जाधव याचा युद्धपातळीवर शोध
त्यामुळे त्यांनी जाधव याची पाहणी केली. मात्र, तो मिळाला नाही. तेव्हा तो पळून गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी येरवडा पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. आशिष जाधव याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, राज्यातील सर्वात संवेदनशील, सर्वाधिक मोठ्या व कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातून कुख्यात गुन्हेगार पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.