कुख्यात गुंडाची फसवणूक अन् अपहरणनाट्य, गुंड अटकेत; काही तासातचं महिलांची सुटका

कुख्यात गुंडाला पुणे स्टेशन भागात स्टॉल मिळवून देण्याचं आमिष दाखवत दोन महिलांनी त्याच्याकडून लाखो रुपये उकळले खरे मात्र त्याला स्टॉल मिळालाच नाही. पैसा आणि स्टॉलही न मिळाल्याने चिडलेल्या या गुंडाने दोन महिलांचे थेट अपहरण करत त्यांना डांबून ठेवत पैसे दिल्याशिवाय सुटका नाही, अशी धमकी दिली.

  पुणे : कुख्यात गुंडाला पुणे स्टेशन भागात स्टॉल मिळवून देण्याचं आमिष दाखवत दोन महिलांनी त्याच्याकडून लाखो रुपये उकळले खरे मात्र त्याला स्टॉल मिळालाच नाही. पैसा आणि स्टॉलही न मिळाल्याने चिडलेल्या या गुंडाने दोन महिलांचे थेट अपहरण करत त्यांना डांबून ठेवत पैसे दिल्याशिवाय सुटका नाही, अशी धमकी दिली. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकांना हा प्रकार समजला. पोलिसांनी काही तासात या महिलांची सुटका करत चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कात्रज ते उत्तमनगर असा या अपहरणनाट्याचा थरार घडला.

  पोलिसांनी बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय ४५, सरडे बाग उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते (वय ३९, गणेशनगर) प्रदीप प्रभाकर नलवडे (वय ३८, भूगाव), अक्षय मारूती फड (वय २४ रा. वारजे) यांना अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस कर्मचारी शंकर संपते, विजय गुरव, प्रदिप शितोळ, विनोद साळुंखे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

  बाबूलाल मोहोळ हा शरद मोहोळ टोळीचा गुंड आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ९ ते १० गुन्हे दाखल आहेत. दरम्यान पीडित महिला या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यातून त्यांची बाबूलाल याच्याशी ओळख झाली होती. एका महिलेने त्याला पुणे स्टेशन परिसरात स्टॉल मिळून देतो असे सांगितले होते. बाबुलाल मोहोळ याने देखील यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी महिलेला बाबूलाल याने जवळपास 6 लाख रुपये दिले. मात्र, पैसे देऊनही त्याला स्टॉल मिळाला नाही. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. पैसे देण्याबाबत सतत सांगत असत.

  दरम्यान बाबुलाल व त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून अशा दोन महिलांचे अपहरण केले. त्यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर महिलेच्या कुटुंबाला फोन करून १७ लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे कुटुंब प्रचंड दहशतीखाली आले. त्यांनी लागलीच गुन्हे शाखेकडे धाव घेतली.

  पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली. खंडणी विरोधी पथकाने तपास सुरू केला. माहिती काढत असताना या महिलांना उत्तमनगर परिसरातील एका आरोपीच्या घरात डांबून ठेवल्याची माहिती पोलीस नाईक शंकर संपते यांना मिळाली होती. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपीच्या घरावर छापा सत्र राबवत या दोन महिलांची सुखरूपरित्या सुटका केली. तसेच चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावडे चौकशी सुरू केल्यानंतर बाबूलाल हा शरद मोहोळ टोळीचा गुंड असल्याचे निदर्शनास आले आहे. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, अधिक तपास सुरू आहे.